ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्त्रीत्व केवळ समानता नव्हे तर, आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरता – सुप्रसिद्ध कवयित्री श्रद्धा शौर्य

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठात "शक्ती ऊर्जा सत्र" या कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

बल्लारपूर: येथील एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल आणि युथ भारती फाऊंडेशन विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त “शक्ती ऊर्जा सत्र” आयोजीत करण्यात आले. या सत्राचा मुख्य उद्देश स्त्रीशक्ती आणि महिला साक्षमीकरण यावर सखोल चर्चा करणे हा होता, ज्याचे नेतृत्व सुप्रसिद्ध कवयित्री, वक्त्या आणि निर्भीड सूत्रसंचालिका कु. श्रध्दा शौर्य यांनी केले. त्यांनी आपल्या शैलीने मंत्रमुग्ध करीत स्त्रीत्व केवळ समानता नव्हे तर, आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरता आहे. प्रतेक स्त्रीने निर्भीड होऊन जगणे शिकले पाहिजे असे आव्हान त्यांनी केले.

सत्राची सुरुवात सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड यांनी प्रमुख वक्त्या श्रध्दा शौर्य यांचा परिचय देऊन केली. श्रध्दा शौर्य यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले तसेच प्रमुख वक्त्या श्रध्दा शौर्य यांनी आपल्या प्रभावी कवितांच्या माध्यमातून स्त्रीशक्ती, तिच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक भूमिकांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी उपस्थित विद्याथिनींना त्यांच्या हक्कांसाठी निर्भीडपणे लढण्याची प्रेरणा दिली. शौर्य यांच्या स्फूर्तीदायी कवितांनी विद्याथिनींना नवा दृष्टिकोन मिळाला .

भारतीय संस्कृतीचा मौल्यवान वारसा पुढे नेण्याच्या संकल्पनेवर आधारित चर्चात्मक सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये श्रध्दा शौर्य यांनी पारंपरिक आणि आधुनिक स्त्रीवादावर आपल्या ठाम विचारांची मांडणी केली.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद एसएनडीटी महिला विद्यापीठाचे माननीय संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी भूषवले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, समाजात स्त्रियांना अधिक शक्तीशाली बनवण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. यावेळी समन्वयक वेदांत अल्मस्ट आणि सांस्कृतिक प्रमुख अश्विनी वाणी यांनीही आपली उपस्थिती दर्शवली. विद्यार्थ्यांनी या सत्राचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

युथ भारती फाऊंडेशनचे श्री. अंकित कलकोटवार यांनी आपल्या भाषणात स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत, विद्याथिनींना समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी समाजात स्त्रियांच्या भूमिका कशा अधिक प्रभावी होऊ शकतात याचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाले. विद्याथिनींच्या सहभागामुळे हा कार्यक्रम अधिक यशस्वी ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपेक्षा पिंपळे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये