Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साहित्य वाटपाने दिव्यांग बांधवांना नवा आधार – आ. किशोर जोरगेवार

३४५ दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप

चांदा ब्लास्ट

आपल्या दिव्यांग बांधवांमध्ये असामान्य प्रतिभा आणि सामर्थ्य असते. विविध आव्हानांचा सामना करताना त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास, मेहनत, आणि धैर्य हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायक आहे. त्यांचं कर्तृत्व आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी प्रत्येक व्यक्तीला जिद्दीने उभे राहण्याची शिकवण देणारी आहे. आजच्या या कार्यक्रमात वाटप करण्यात आलेल्या साहित्याने दिव्यांग बांधवांना नवा आधार मिळाला असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

  दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी आमदार निधीतून चंद्रपूर महानगरपालिकेला २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या साहित्याचे आज गुरुवारी प्रियदर्शनी सभागृहात दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त राजेंद्र भिलाने, श्री माता महाकाली महोत्सव समीतीचे सचिव अजय जैयसवाल, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, अल्पसंख्याक युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, ग्रामिण तालुका संघटक राकेश पिंपळकर, सायली येरणे, कल्पना शिंदे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

  यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, लोकप्रतिनिधीवर समाजातील प्रत्येक घटकाचा अधिकार आहे, त्याला त्याच्या कर्तृत्वानुसार संधी मिळावी आणि योग्य ती मदत मिळावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आपण दिव्यांग बांधवांना केवळ साहित्य देत नाही, तर त्यांच्या आत्मसन्मानाचं आणि आत्मविश्वासाचं बळ वाढवत आहोत. त्यांच्या आयुष्याला एक नवा दृष्टिकोन देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. हे साहित्य त्यांच्यासाठी एक साधन आहे, ज्याच्या मदतीने ते आपल्या क्षमतेनुसार कार्य करू शकतील. आपल्या राज्यसरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. शिक्षण, रोजगार, आणि आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. याचाही दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा. यासाठी अडचणी येत असल्यास आपल्या कार्यालयात आपण निशुल्क सेवा देणारे कर्तव्य सेतू केंद्र तयार केले आहे. या केंद्राला आपण भेट द्यावी, असे आवाहनही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिव्यांग बांधवांना केले. चंद्रपूरातील एकही दिव्यांग बांधव साहित्याविना राहणार नाही, हा आपला संकल्प आहे. सोबतच दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास, त्या जागेवर आपण दिव्यांग बांधवांना ‘अम्मा की दुकान’ म्हणून दुकान उपलब्ध करून देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    यावेळी बोलताना मनपा आयुक्त विपिन पालिवाल म्हणाले की, आमदार किशोर जोरगेवार यांनी निधी दिल्यामुळे आज येथे दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करू शकत आहोत. सामाजिक उपक्रमात आमदार किशोर जोरगेवार नेहमी पुढाकार घेत असतात. त्यांनी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या सहकार्यामुळेच आपण शहरातील विविध भागात भव्य आरोग्य शिबिरे घेतली आहेत. दिव्यांगांना हक्काचे घर मिळावे, अशी अपेक्षा आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. आपण नक्कीच या सूचनेचे पालन करणार असून शासनाच्या योजनेंतर्गत त्यांना घर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल म्हणाले. या कार्यक्रमात ३४५ दिव्यांग बांधवांना व्हिलचेअर, वॉकर, काठी, एल्बो स्टिक, युरिन पॉट, कर्णयंत्र यासह विविध साहित्याचे हजारो दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये