वाढत्या तापमानाच्या संकटावर ‘पिक विविधता’ उत्तम पर्याय : डॉ. जीवन कतोरे यांचे आवाहन
शेतकरी शास्त्रज्ञ मंच सभे दरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा स्थापित शेतकरी शास्त्रज्ञ मंच सभा हिंगणघाट तालुक्यातील भगवा येथील प्रगतीशील शेतकरी श्री. बलराज श्योखंड यांच्या शेतावर आयोजीत करण्यात आली. सध्याच्या बदलत्या हवामानात आणि अनिश्चिततेच्या काळात शेतकऱ्यांनी केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता पिक विविधता अंगीकारणे काळाची गरज आहे, या विषयावर शेतकरी-शास्त्रज्ञ मंच सभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री. दिलीप पोहाणे, सदस्य श्री. इरफान अली, निलेश नाखले, सिंजेंटा फाऊंडेशन चे श्री. भूषण गाडेगोणे, डॉ. भारती तिजारे, विषयतज्ञ (कृषिविद्या), डॉ. सचिन मुळे विषयतज्ञ (पशु संवर्धन व दुग्धशास्त्र), डॉ. अंकिता अंगाईतकर विषयतज्ञ (विस्तार शिक्षण) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना महत्वाच्या मुद्द्यांवर भर देत शास्त्रीयदृष्ट्या ही झाडे पावसाच्या पाण्याचा वेग कमी करून ते जमिनीत मुरण्यास मदत करतात. मोठ्या प्रमाणावर कार्बन साठवून ठेवल्यामुळे क्लायमेट चेंज च्या परिणामांविरुद्ध लढण्यास मदत होते तसेच शेतात झाडांची संख्या वाढल्यामुळे मित्र कीटक आणि पक्ष्यांचा वावर वाढतो, जो नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतो असे मार्गदर्शन केले तसेच वाढत्या तापमानाच्या संकटावर पिक विविधता उत्तम पर्याय आहे याचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा असे आवाहन या प्रसंगी त्यांनी केले.
श्री. बलराज श्योखंड मुळचे हरियाणा येथील असून हिंगणघाट तालुक्यातील भगवा येथे १० वर्षांपूर्वी शेती करण्याकरिता स्थायिक झाले. यांनी आपल्या शेतात कापूस, सोयाबीन यांसारखी पारंपारिक पिके न घेता बांबू, निलगिरी आणि सरू या झाडांची लागवड करून एक नवीन प्रयोग केला आहे. पुढे अॅग्रोटूरीझम तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. सभेला उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांनी आणि इतर शेतकऱ्यांनी या उपक्रमाची पाहणी केली. कमी कष्ट आणि शाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून या वृक्ष लागवडीकडे पाहिले जात आहे.
बांबू इतर झाडांच्या तुलनेत अधिक ऑक्सिजन वातावरणात सोडतो. हा वृक्ष कार्बन शोषून घेण्याचे (Carbon Sequestration) उत्तम साधन आहे, ज्यामुळे जागतिक तापमान वाढ रोखण्यास मदत होते. ज्या जमिनीत इतर पिके येत नाहीत किंवा जी जमीन पाणथळ आहे, तिथे निलगिरी उत्तम वाढते. ही झाडे जमिनीतील क्षारांचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात. अत्यंत कमी वेळात जास्त लाकूड (बायोमास) देणारे हे झाड असल्याने कागद उद्योग आणि इंधनासाठी हे उत्तम स्रोत आहे. सरूच्या मुळांवर ‘फ्रँकिया’ (Frankia) नावाचे जिवाणू असतात. हे जिवाणू हवेतील नत्र शोषून जमिनीत स्थिर करतात, ज्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. असे मार्गदर्शन शास्त्रज्ञांनी या प्रसंगी केले.
बांबू आणि निलगिरी सारख्या पिकांना सुरुवातीचा काळ सोडल्यास जास्त देखभालीची गरज नसते. औद्योगिक कारणांसाठी बांबू आणि निलगिरीला असलेली वाढती मागणी लक्षात घेता, हे प्रयोग आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहेत. शेतकऱ्यांनी बाजाराची मागणी ओळखून आपल्या शेती पद्धतीत बदल करायला हवा. या प्रसंगी शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधता आल्यामुळे आणि प्रत्यक्ष शेतावर जाऊन प्रयोग पाहता आल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
सदर सभेचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री. गजेंद्र मानकर, श्री. गणेश वायरे व ग्रामस्थांनी योगदान दिले.



