शिक्षक हा समाजाच्या उभारणीचा आधारस्तंभ – डॉ. सचिन मडावी
इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, चंद्रपूर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जलनगर वार्ड येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे होते. यावेळी उद़घाटक म्हणून सहाय्यक संचालक डॉ. सचिन मडावी उपस्थित होते. तसेच इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी रोहन कांबळे, तसेच सहाय्यक लेखाधिकारी अंजू बालमवार, मुख्याध्यापक लोकचंद राठोड, नवनाथ वरारकर, एस. टोंगे,आशा एकरे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
आपल्या प्रभावी भाषणात डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले की, “शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नाही, तर समाज घडवणारा शिल्पकार आहे.” त्यांनी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अपार क्षमता असून त्यांच्या क्षमतेला वाव देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देऊन विद्यार्थी जागतिक स्तरावर नेण्याचे उद्दिष्ट शिक्षकांनी डोळयासमोर ठेवले पाहिजे. तसेच, आश्रमशाळांना लागणाऱ्या मूलभूत सुविधांसाठी विभाग कटिबद्ध असून, लवकरच त्या उपलब्ध करून दिल्या जातील, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी इतर मागास बहुजन कल्याणव विभागातंर्गत येत असलेल्या 31 शाळांचा मुख्याध्यापक व शिक्षकांचा चमूचा संविधान उद्देशिका, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावरील समग्र वाड:मय व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला व प्रेरणादायी विचारांची देवाणघेवाण झाली.हा कार्यक्रम केवळ एक औपचारिक सोहळा न राहता, शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेच्या नव्या दिशेचा आरंभ ठरला, असे उपस्थितांनी नमूद केले.कार्यक्रमाचे संचालन अमोल घुगुल तर आभार प्रदर्शन इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी रोहन कांबळे यांनी केले.