ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

पुष्पा श्रावण पोडे (पाचभाई) यांना मानाचा ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल अवॉर्ड’

महाराष्ट्रातून एकमेव नर्सिंग अध्यापिका : राष्ट्रपती भवन येथे होणार राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

चांदा ब्लास्ट

सरकारी रुग्णालयातील नर्सिंग अध्यापिका पुष्पा श्रावण पोडे (पुष्पा दत्तात्रय पाचभाई) यांना ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल अवॉर्ड’ नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहिर झाला आहे. येत्‍या २२ जून २०२३ रोजी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. विशेष म्‍हणजे पुरस्‍कार मिळालेल्‍या पुष्पा पोडे ह्या महाराष्ट्रातून एकमेव नर्सिंग अध्यापिका आहेत.

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्‍लारपूर तालुक्‍यात असलेल्‍या कळमना येथे शेतकरी कुटुंबात पुष्पा श्रावण पोडे यांचा जन्‍म झाला. त्‍यांना तीन बहिणी, दोन भाऊ असून तीन बहिणी ह्या शिक्षीका आहेत. पुष्पा पोडे (पाचभाई) या मागील २००१ पासून नर्सिंग क्षेत्रात कार्यरत असून विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहे. पोडे यांनी २००१ मध्ये ग्रामीण रुग्णालय अहेरी येथून आपल्या कार्याची सेवा सुरू केली. गडचिरोली जिल्ह्यासारख्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी पाच वर्षे अविरत कार्य करत रुग्णांची सेवा केली. त्‍यानंतर चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे त्यांची बदली झाल्यानंतर आजवर अविरत बावीस वर्ष त्‍यांनी रुग्णसेवा दिलेली आहे. रूग्‍णसेवा करीत असतानाच त्‍यांनी बी.एससी नर्सिंग, एम.एससी नर्सिंग केले. सध्या त्‍या शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे कार्यरत आहेत.

कोरोनासारख्या काळात त्यांनी आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करून कोरोनाशी लढण्यासाठी तयार केले आणि स्वतःही कोरोना काळात त्यांनी अविरत रुग्णांची सेवा करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यांना अनेक जिल्ह्यात पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. त्‍यांच्या या कार्याची दखल घेत नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया यांनी पुष्पा पोडे (पाचभाई) यांची ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल अवॉर्ड’ नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.   त्यांना २२ जून रोजी मान. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल अवॉर्ड’ वितरित करण्यात येणार आहे. त्‍यांनी आपल्‍या यशाचे श्रेय त्यांचे वरिष्ठ सहकारी, परिवार यांना दिलेले आहे. त्यांनी पुढेही असेच अविरत कार्य सुरू ठेवण्याचा निश्‍चय केला असून हा पुरस्कार पुष्पा पोडे (पाचभाई) यांनी महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित केला आहे.

पुष्पा पोडे (पाचभाई) ‍यांच्या पुरस्‍कार निवडीबद्दल आमदार सुधाकर अडबाले, से.नि. मुख्याध्यापिका सौ. सीमा अडबाले, दत्तात्रय पाचभाई, सुरेश अडवे, सुरेंद्र अडबाले व समस्‍त अडबाले, पोडे, अडवे, पाचभाई परिवाराने अभिनंदन केलेले आहे. महाराष्ट्रातून एकमेव नर्सिंग अध्यापिका म्‍हणून पुष्पा पोडे (पाचभाई) यांची पुरस्‍कारासाठी निवड झाल्‍याने ही चंद्रपुरकरांसाठी अभिमानास्‍पद बाब असल्‍याचे मत आमदार सुधाकर अडबाले यांनी व्‍यक्‍त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये