ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी छत्तीसगड राज्याची सीमा रोखणार

गडचिरोली जिल्ह्यातील बोटेकसा येथे १४ डिसेंबर रोजी रास्तारोको आंदालन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : विदर्भ राज्य वेगळे करण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आंदोलनाची मालिका सुरू आहे. आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत असून, डिसेंबर महिन्यात सलग ३ आंदोलन करण्यात येणार आहे. पहिले आंदोलन १४ डिसेंबर रोजी गडचिरोली-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बोटेकसा येथे होणार असून, येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ‘विराआंस’चे संयोजक माजी आमदार ॲड. वामन चटप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘विदर्भ राज्य मिळवू औंदा’ हे घोषवाक्य घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीने मागील वर्षभरापासून आंदोलनाची मालिका सुरू केली आहे. १४ डिसेंबररोजी बोटेकसा येथे रास्तारोको आंदोलन केल्यानंतर २० डिसेंबर रोजी अकोला येथे विदर्भ निर्माण संकल्प मेळावा प्रमिलाताई ओक सभागृहात होणार असून, बुधवार २७ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. या उपोषणात सर्व विदर्भवादी नेते सहभागी होणार आहे. विदर्भ राज्याची निर्मिती झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशाराच यावेळी चटप यांनी दिला आहे. विदर्भात सर्वाधिक वीज निर्माण होत असतानाही अन्य राज्याच्या तुलनेत राज्यातील सर्वांत महागडी वीज नागरिकांना पुरविली जात आहे. शिवाय प्रदूषणाचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. नोकऱ्यांचा अनुशेष शिल्लक आहे. रोजगार, उद्योगांची वाणवा असून, स्वतंत्र राज्याशिवाय विदर्भ राज्याचा विकास शक्य नसल्याने विदर्भातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

वीजेची दरवाढ मागे घेण्यात यावी, शेतीपंपाला दिवसा वीजपुरविण्यात यावी, विदर्भात येऊ घातलेले औष्णीक वीज प्रकल्प विदर्भाबाहेर न्यावे, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करण्यात यावा, हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात यावे, बल्लारपूर – सुरजागड रेल्वेमार्गाला केंद्राने तत्काळ मंजुरी प्रदान करावी आदी मागण्यांकडेही या आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधणार असल्याचे ॲड. चटप यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विराआंसचे जिल्हाध्यक्ष किशोर दहीकर, कपिल इद्दे, अनिल दिकोंडवार, मारोती बोथले, मनोहर गेडाम, नीळकंळ कोरांगे, अरुण नवले, सुनील बावणे, रमेश पावडे, मधू चिंचोलकर आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये