“हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत राष्ट्रध्वजावर आधारित विविध स्पर्धा संपन्न
सामान्य ज्ञान,राखी,रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट
“आजादी का अमृत महोत्सव” निमित्त भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या “हर घर तिरंगा” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागाने मनपा शाळांमध्ये विविध देशभक्तीपर स्पर्धांचे आयोजन केले. या स्पर्धांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी अभिमान, देशभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करणे हे होते.
या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वजावर आधारित विविध स्पर्धा मनपाच्या सर्व शाळांमध्ये घेण्यात आल्या ज्यात सामान्य ज्ञान, राखी बनविणे, रांगोळी व चित्रकला या चार प्रमुख स्पर्धांचा समावेश होता.
सामान्य ज्ञान स्पर्धा – यात विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचा इतिहास, त्याचे महत्त्व, ध्वज संहिता तसेच राष्ट्रीय प्रतीके आणि स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या घटनांवर प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे देत आपल्या ज्ञानाची झलक दाखवली.
राखी बनविणे स्पर्धा – आपल्या हस्तकौशल्याचा वापर करून सुंदर, आकर्षक व भावनाप्रधान राख्या तयार करून देशरक्षणासाठी झटणाऱ्या जवानांप्रती व व पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रति आपुलकी आणि सन्मान व्यक्त करण्यास राष्ट्रध्वजावर आधारित ‘राखी बनविण्याची स्पर्धा’ आयोजित करण्यात आली. ज्यात विद्यार्थ्यांनी तिरंग्याचे रंग वापरून सैनिक व पोलीस बांधवांसाठी आकर्षक राख्या तयार केल्या.
रांगोळी स्पर्धा – शाळेच्या प्रांगणात तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या देशभक्तीपर रांगोळ्यांनी देशप्रेमाचे वातावरण निर्माण केले.
चित्रकला स्पर्धा – विद्यार्थ्यांनी कॅनव्हासवर तिरंग्याचे विविध रूप, स्वातंत्र्य संग्रामातील वीर व्यक्तीमत्वे व राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश रंगवले.
स्पर्धेदरम्यान शाळांमध्ये देशभक्तीपर गीते व घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. शिक्षक, पालक व स्थानिक नागरिकांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विजेत्यांची निवड शिक्षक समितीने केली असून, त्यांना लवकरच प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून, “हर घर तिरंगा” अभियानाच्या यशात शालेय विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागाने सांगितले.
हर घर तिरंगा” अभियानात विविध कार्यक्रम घेतले जात असुन सव विद्यार्थी,युवा वर्ग,नागरिकांनी सांस्कृतिक मंत्रालयाच्या mygov.in या संकेतस्थळावर तिरंग्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घ्यावा व harghartiranga.com वर राष्ट्रध्वजासह आपले सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.