ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीत कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव संपन्न

चांदा ब्लास्ट
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असतात त्यांना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. त्यातील काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व औषधीही असतात. अशा रानभाज्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले होते. रानभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्यापर्यंत पोहचण्यासाठी अशा महोत्सवांची व्याप्ती वाढविणे ही काळाची गरज आहे. रानभाजी महोत्सवामुळे रानभाज्यांना चांगले मार्केट लाभेल. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा भाज्यांचे चांगले भाव मिळतील याबरोबरच जनतेला माहिती नसणाऱ्या भाज्यांचीही ओळख होईल. जून-जुलैच्या पावसाबरोबर सुरु झालेला रानभाज्यांचा हंगाम ऑक्टोबर पर्यंत चालतो. रानभाज्या निसर्गाताच उगवून येत असल्यामुळे त्या सेंद्रीय असतात त्यांची पौष्टीकताही चांगल्या दर्जाची असते. निसर्गाताच निर्माण झालेल्या या रानभाज्या जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने रानभाज्यांच्या महोत्सवाचे सुसज्य आयोजन केले होते.
तालुक्यातील आरोग्या प्रति जागरूक असणाऱ्या नागरिकांसाठी व तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते.
सध्याच्या धावपळीच्या युगात नागरिक फास्ट फूड कडे जास्त आकर्षित होत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या रानभाज्या, त्यांची ओळख, आहारातील महत्त्व नागरिकास होणे अत्यंत आवश्यक व काळाची गरज आहे. असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी गावडे यांनी केले. रानभाजी बाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी म्हणून, तालुका कृषी विभाग जिवती यांच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी होते, तर प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष डॉ अंकुश गोतावळे, प्रगतशील शेतकरी दत्ता कांबळे, शंकर रेवा चव्हाण, तालुका कृषी अधिकारी गावडे आदींची उपस्थिती होती.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये