ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तरुणांनो आपली मानसिकता सैनिकी बनवा – कॅप्टन चिन्मय भाकरे

25 वा कारगिल विजय दिन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘आज आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत. समस्यांना तोंड द्यायचे असेल तर देशाला चांगल्या तरुण नागरिकांची गरज आहे. आतंकवाद दहशतवाद हिंसाचार यासारख्या समस्यांना निपटण्यासाठी साहसी, देशभक्त, समर्पित व प्रशिक्षित नागरिकांची देशाला नितांत गरज आहे. या दृष्टिकोनातून राष्ट्रीय छात्र सेनेतून तरुणाई घडत आहेत. तरुणांनी सैनिकी प्रशिक्षण घेतले पाहिजे. म्हणजे आपली मानसिकता सैनिकी बनेल. तरुणांनो आपली मानसिकता सैनिकी बनवा, असे प्रतिपादन 25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत स्थानिक एस.एस.एन.जे.

महाविद्यालयातील एनसीसी युनिट तर्फे अभिवादन कार्यक्रमात कॅप्टन चिन्मय भाकरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात 26 जुलै रोजी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनिता सोनारे प्रमुख वक्ते म्हणून 24 शीख रेजिमेंटचे तरुण कॅप्टन चिन्मय भाकरे उपस्थित होते. यावेळी मंचावर गुरुदेव सेवा मंडळाचे बाळकृष्ण हांडे, भैय्याजी इंगळे, सैन्य दलात कार्यरत सैनिक संकेत काळे व एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.

कारगिल विजय दिनानिमित्त युद्धात शहीद झालेल्या 527 सैनिकांना स्मरून शाहिद स्मारकाला पुष्पचक्र वाहण्यात आले. शहिदांना छात्र सैनिकांनी रायफल सलामी देऊन अभिवादन केले.

या प्रसंगी कारगिल युद्धातील काही प्रसंग एनसीसी छात्र सैनिकांनी नृत्य नाट्य स्वरूपात सादर करून वातावरण देशभक्तीमय केले. एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी कारगिलच्या लढाईची वीर गाथा विशद केली.

कॅप्टन चिन्मय भाकरे यांनी सैनिकी जीवन या विषयावर मांडणी करून सैन्य दलात एनसीसी छात्र सैनिकांना विविध संधी यावर मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सूनीता सोनारे यांनी एनसीसी युनिटच्या उपक्रमाचे कौतुक करून कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या व युवकांनी सैन्य दलात सहभागी होण्याकरिता आवाहन केले.

याप्रसंगी एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र धारक छात्र सैनिकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गार्ड ऑफ ऑनरचे संचालन कॅडेट रितेश बुटे व श्रद्धा मडावी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कॅडेट कोमल शितळे व सुप्रिया यादव तर आभार कांचन राऊत हिने मानले.

यशस्वीतेकरिता सार्जंट आदर्श नाईक, आदित्य तामगाडगे, मनोज नेहारे व एनसीसी छात्र सैनिकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व एनसीसी छात्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारगिल दिन समारोपाची सांगता ‘हम सब भारतीय है…..’ या एनसीसी गीताने झाली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये