छत्तीसगडच्या ३९ प्रशिक्षणार्थी वन अधिकाऱ्यांचा चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे दीक्षांत समारंभ

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर येथील वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी (वन अकॅडमी) या प्रशिक्षण संस्थेत छत्तीसगड राज्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थी बॅच-२ (२०२३-२५) यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात ३९ प्रशिक्षणार्थींनी १८ महिन्यांचे कठोर प्रारंभिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत ‘वन अधिकारी’ म्हणून पुढील सेवेसाठी सज्ज झाल्याची घोषणा करण्यात आली.
या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये २६ पुरुष व १३ महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शोमिता बिस्वास उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) एम. श्रीनिवास रेड्डी तर विशेष अतिथी म्हणून छत्तीसगडचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नाविद शुजाउद्दीन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणक्रमात १९ शैक्षणिक विषय आणि ७ प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश होता, तर ५ मोठ्या अभ्यास दौऱ्यांमधून संपूर्ण भारतातील जैवविविधता व वनसंवर्धनाच्या क्षेत्रातील अनुभव प्रशिक्षणार्थ्यांना मिळाले. अभ्यास दौऱ्यामध्ये हिमालयीन देवदार जंगलांपासून ते सुंदरबनच्या मॅंग्रोव्ह्स, ओडिशातील कासव संवर्धन, दक्षिणेतील व्याघ्र प्रकल्प, वाळवंटी जंगल व्यवस्थापनापर्यंतचा व्यापक अभ्यास करण्यात आला.
या बॅचमधील ३० प्रशिक्षणार्थींनी ७५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून ‘ऑनर्स’ प्राप्त केले. यात दिनेश कुमार साहू यांनी ८७.३० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकासह ऑनर्स पदक आणि तीन विभागांतील रौप्यपदके पटकावली. अंतरंग पांडे यांनी परिस्थितिकी विषयात विशेष प्राविण्य मिळवले.
आपल्या भाषणात संचालक श्री. रेड्डी यांनी सांगितले की, ही तुमच्या सेवापथाची सुरुवात आहे. ज्ञान, संवेदनशीलता आणि नेतृत्वगुण हेच खरे वनअधिकाऱ्याचे ओळखचिन्ह आहेत. त्यांनी विज्ञानाधिष्ठित धोरणे आणि समुदाय-संवर्धनाभिमुख दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले.
समारोपाच्या भाषणात त्यांनी पुढे सांगितले, छत्तीसगडची जंगले पवित्र आहेत. ही सेवा केवळ नोकरी नसून वन्यजीव, पर्यावरण व समुदायांप्रती असलेली जबाबदारी आहे. तुम्हीच हरित प्रशासनाचे भविष्य आहात.