अपघातात पत्नीचा मृत्यू,पती व मुलगी जखमी
अपघाताची योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- येथील एका शिक्षकाच्या मोटरसायकल ला भरधाव पीक अप वाहनाने मागून जोरात धडक दिली.त्यात पत्नीचा चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर पती व मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडचांदूर ते पाटण मार्गावरील भेंडवी घाटात घडली.
श्रीदेवी राम दिंडे (३४) असे मृत पत्नीचे तर राम पंढरीनाथ दींडे (४२) व मुलगी पूनम राम दींडे (१०) असे जखमीचे नावे आहेत.ते तालुक्यातील नंदप्पा येथील रहिवाशी असून ते MH 34 BX- 1871 या क्रमांकाच्या मोटर सायकलने गडचांदूर वरून भेंडवी मार्गे नंदप्पा येथे जात होते. राम दिंडे हे मोटरसायकल चालवीत होते. तर श्रीदेवी व त्यांची मुलगी पूनम ह्या मागे बसल्या होत्या. दरम्यान भेंडवी घाटात मागून वेगात येणाऱ्या MH 34 BZ – 6708 क्रमांकाच्या पिक अप वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला मागून जोरात धडक दिली त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्याच वेळी पिक अप मध्ये असलेल्या इतर नागरिकांनी त्या तिघांनाही गडचांदूर येथे उपचारासाठी घेऊन गेले असता पत्नी, श्रीदेवी या जास्त गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले असता तिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी श्रीदेवी यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी पाटण पोलिसांनी पिकअप चालकाविरुद्ध दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कोकोडे करीत आहेत
आमचा अपघात झाला नसून तो जाणीवपूर्वक घडवून आणला असा संशय मला वाटत आहे. या अपघाताची संबंधित पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी व माझ्या पत्नीला न्याय द्यावा अशी मागणी पती राम दिंडे व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.