तंत्रज्ञानाचा वापर समाजोपयोगी व्हावा – आ. किशोर जोरगेवार
बी.टेक. प्रथम वर्ष २०२४-२५ सत्रासाठी 'फ्लेम डीके २५' कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट
आजचा काळ हा प्रगतीचा, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाचा काळ आहे. आज अनेक तरुण उच्च शिक्षण घेत आहेत, नव्या गोष्टी शिकत आहेत; परंतु त्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी किती होतोय, यावर विचार करणे गरजेचे आहे. तुम्ही शिकलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग समाजोपयोगी व्हावा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ईस्ट) व राजीव गांधी अभियांत्रिकी संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बी.टेक. प्रथम वर्ष २०२४-२५ सत्रासाठी ‘फ्लेम डीके २५’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार जोरगेवार बोलत होते. यावेळी सरदार पटेल मेमोरियल सोसायटी ट्रस्टचे अध्यक्ष विनोद दत्तप्रेय, कोषाध्यक्ष निनाद गडमवार, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, तुम्ही यंत्र तयार करा, युक्त्या शोधा, उपाय सुचवा पण त्या केवळ आत्मकेंद्रित न राहता, समाजाच्या गरजांशी जोडल्या गेल्या पाहिजेत. आपल्या भागातील पाण्याची समस्या, शेतीतील अडचणी, आरोग्यसेवा, शिक्षणातील तांत्रिक अडथळे या सगळ्यांवर उपाय शोधायला तुम्ही पुढे आलात,तरच खऱ्या अर्थाने शिक्षणाचे चीज होईल. तुमचं शिक्षण, तुमचं ज्ञान, तुमचं कौशल्य हे केवळ नोकरीसाठी न वापरता, समाजासाठी, देशासाठी वापरा. आजचा कार्यक्रम केवळ एक कार्यक्रम नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याची नवी दिशा ठरवणारा, नेतृत्व, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणारा एक अत्यंत उपक्रम आहे.
आजच्या युगात केवळ पदवी मिळवणे एवढेच पुरेसे नाही, तर आपण सृजनशील, दूरदृष्टी ठेवणारे आणि समाजासाठी उत्तरदायी नागरिक होणे तितकेच आवश्यक आहे. या सारखे उपक्रम हे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे, त्यांच्या प्रतिभेला चालना देणारे आणि भविष्यातील आघाडीचे नेतृत्व घडवणारे आहेत. केवळ नोकरी मिळवायची नाही, तर नवे रोजगार निर्माण करायचे. केवळ तंत्रज्ञान शिकायचे नाही, तर त्याचा समाजोपयोग कसा होईल याची चाचपणी करा. तुम्ही उद्याचे संशोधक, उद्योजक आणि परिवर्तन घडवणारे बना असे आवाहन यावेळी बोलतांना आ. जोरगेवार यांनी केले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.