कोरपणा परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट!
पानठेल्यांवर ‘खरा’ची खुलेआम विक्री, सट्टा-जुगार अन् दारूवाल्यांना कोणाचा वरदहस्त?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा :_ परिसरात अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याची जोरदार चर्चा असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी बिनधास्तपणे सट्टा-पट्टी, जुगार व दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. एवढेच नव्हे तर काही पानठेल्यांवर ‘खरा’ व इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री उघडपणे होत असल्याचा आरोप केला जात आहे.
पोलिसांचा धाक उरला आहे का?
अवैध धंद्यांबाबत नागरिकांकडून तक्रारी होत असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. पानठेल्यांवर खुलेआम प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्यास त्यांच्यावर कारवाई का होत नाही? सट्टा-पट्टी व जुगाराचे अड्डे सुरू असल्याच्या तक्रारींकडे कोणाचे दुर्लक्ष आहे? दारूची बेकायदा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास प्रशासनाला नेमकी अडचण कोणती? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
अवैध धंद्यांना ‘अभय’ कोणाचे?
कोरपणा परिसरात हे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी खऱ्या असतील, तर त्यामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. कारवाईच्या नावाखाली केवळ दिखावा न करता संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
अवैध दारू विक्री, सट्टा-पट्टी, जुगार आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस व संबंधित विभाग संयुक्त मोहीम राबवणार का? की तक्रारींकडे असेच दुर्लक्ष सुरू राहणार? याकडे आता कोरपणा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



