आ.जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश ; सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांवर शासनाचे तातडीचे आदेश
चंद्रपूर सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरती प्रक्रियेला गती, कामगार मंत्री यांचे आदेश

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांचा मुद्दा आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात प्रभावीपणे उपस्थित केला होता. सुरक्षा रक्षकांच्या नोंदणी, भरती प्रक्रिया तसेच मंडळातील अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे निर्माण झालेल्या अडचणींबाबत त्यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. त्यानंतर आता मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
बैठकीदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक आस्थापनांकडून सुरक्षा रक्षकांची मागणी करण्यात येत असतानाही मंडळाकडून नोंदणी आणि पुरवठा वेळेत होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. तसेच जिल्ह्यातील विविध आस्थापनांकडून सुरक्षा रक्षकांची वाढती मागणी लक्षात घेता लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्याची मागणीही आमदार जोरगेवार यांनी केली होती. मंडळातील अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे सुरक्षा रक्षकांच्या विविध समस्यांचे निराकरण वेळेत होत नसल्याचेही आमदार जोरगेवार यांनी बैठकीत मांडले होते.
यावर आता कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून, ज्या आस्थापनांनी सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे, त्यांची त्वरित नोंदणी करून आवश्यकतेनुसार सुरक्षा रक्षक पुरविण्याबाबत पुढील योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशांची अंमलबजावणी चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत करण्यात येणार आहे.
मंडळाने सुरक्षा रक्षकांच्या भरतीबाबत तात्काळ पुढील कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देशही कामगार विभाग आणि चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला देण्यात आले आहेत. कामगार आयुक्तांना मंडळातील कर्मचारी भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करून तात्काळ पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही ना. आकाश फुंडकर यांनी दिले आहेत.



