सवई भट यांच्या सुरेल स्वरांतून महाकाली महोत्सवात जागली भक्तिभावाची प्रभा
पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची महोत्सवाला भेट, उद्या निघणार भव्य नगर प्रदक्षिणा पालखी

चांदा ब्लास्ट
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली महोत्सवाच्या पावन वातावरणात काल रविवारी संध्याकाळी सुप्रसिद्ध गायक सवई भट यांच्या भक्तीमय गायनाने भाविकांच्या अंतरंगाला स्पर्श केला. त्यांच्या सुरमधुर भजनांनी महोत्सव परिसर स्वरमंदिर बनले होते. आरतीच्या दिव्यांच्या लखलखाटात आणि “जय माता दी” च्या घोषात भजनांच्या सुरांनी भक्तिरसाचा दरबार रंगून गेला. तर महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी नागपूर विभागाचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी महोत्सवाला भेट दिली.
रविवारी कार्यक्रमाच्या प्रारंभी महाकाली मातेला महाआरती अर्पण करण्यात आली. त्यानंतर सवई भट यांनी आपल्या सुरेल आवाजात भक्तिगीते सादर करताच वातावरणात भक्तिभावाचे वारे दरवळू लागले. त्यांच्या प्रत्येक आलापात प्रार्थनेचा आविष्कार आणि प्रत्येक शब्दात मातृशक्तीची स्मृती जागृत झाली. या भक्तीमय संगीतमहोत्सवाला हजारो भाविकांसह महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार व विविध मान्यवर उपस्थित होते.
श्री माता महाकालीच्या महाआरतीने महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर भजन कार्यक्रम पार पडला. लखमापूर येथील हनुमान मंदिर तर्फे सुंदरकांडचे आयोजन उत्साह आणि भक्तीमय वातावरणात पार पडले. त्यानंतर दुपारी 2 वाजता पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी महोत्सवस्थळी भेट देत मातेची आरती केली. यावेळी नवरात्री दरम्यान जन्मलेल्या कन्यांना संदीप पाटील यांच्या हस्ते चांदीचे नाणे देण्यात आले. तसेच ज्येष्ठ मायमाउलींचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच कन्यापूजन आणि भोजन स्थळी भेट देत संदीप पाटील यांनी कन्यांना मातेचा दुपट्टा ओढला. या कार्यक्रमात बोलताना संदीप पाटील म्हणाले की, आजची पिढी वाईट व्यसनाकडे ओढवली जात आहे. घरोघरी तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र घरी आध्यात्मिक वातावरण ठेवल्यास या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात, संस्कारातून व्यक्ती घडतो पुढे या व्यक्तींमुळे समाज घडत असतो. मातेला पूजणारा जगात भारत हा एकमेव देश आहे. येथे मातांचा सन्मान केला जातो.
हीच परंपरा आमदार किशोर जोरगेवार महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून पुढे नेत आहेत. आमदार किशोर जोरगेवार सामाजिक मन असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे अनेक सेवाभावी उपक्रम चंद्रपूरात सुरू आहेत. माता महाकालीचे दर्शन घेत असताना अदृश्य ऊर्जा जाणवली, याच उर्जेतून चंद्रपूरची सर्वांगीण उन्नती होणार असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला श्री माता महाकाली महोत्सवाचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, निवृत्त जिल्हाधिकारी सतीश वासाडे, अप्पर पोलिस अधिकारी इश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, मनीष महाराज, श्री माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त बलराम डोडाणी, राजू शस्त्रकार, अजय वैरागडे, सविता दंडारे, संजय बुरघाटे, प्रदीप माने, संदीप साळुंखे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
महाकाली महोत्सवात विविधतेत एकतेचे दर्शन
चंद्रपूर – महाकाली महोत्सवाच्या रंगारंग कार्यक्रमात विविधतेत एकतेचे दर्शन घडले. या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या लोककलांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
राजस्थान येथील नामांकित कलावंताने अप्रतिम भवई नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. राजस्थानी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या नृत्यप्रकाराने सभागृहात टाळ्यांचा वर्षाव झाला. महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून विविध प्रांतातील कला आणि संस्कृतीचा संगम अनुभवता आला.
उद्या शहरातून निघणार भव्य नगर प्रदक्षिणा पालखी
उद्या सायंकाळी 4 वाजता महाकाली मंदिर येथून श्री माता महाकाली नगर प्रदक्षिणा पालखीला सुरुवात होणार आहे. ही पालखी गांधी चौक होत जटपूरा गेटला वळसा घालून पुन्हा महाकाली मंदिर परिसरात पोहोचणार आहे. पालखीत सुप्रसिद्ध जगराता लखबीर सिंग लख्खा यांचे सुपुत्र पन्ना सिंग गिल लख्खा यांचा रोड शो विशेष आकर्षण राहणार आहे. सोबतच श्री माता महाकालीच्या चांदीच्या मूर्तीचा व चांदीच्या पालखीचा नगर प्रदक्षिणेत सहभाग राहणार आहे.
गंगा आरती, पोतराजे नृत्य समूहांचा सहभाग, उत्तराखंड राज्यातील केदारनाथ धाम येथील झांज डमरू पथक, मध्यप्रदेश राज्यातील शिवतांडव अघोरी नृत्य, कर्नाटक राज्यातील पवनसुत प्रभू श्री बाहुबली हनुमान यांचे बोलके दृश्य, पंढरपूर येथील १०८ वारकरी यांचा टाळ, मृदंग गर्जना समूह, विविध प्रकारचे आदिवासी नृत्य, ढेमसा आदिवासी पारंपारिक नृत्य, रेला आदिवासी पारंपारिक नृत्य, ढोलशा आदिवासी पारंपारिक नृत्य, अश्वावर आरूढ नवदुर्गाचे बोलके दृश्य, तुतारी व अब्दार, मुलांची शस्त्र प्रात्यक्षिके, विविध समाजांमार्फत झांकी, विविध सामाजिक संघटनांची झांकी, शहरातील विविध व्यायामशाळांच्या वतीने नगर प्रदक्षिणा पालखीत प्रात्यक्षिके, प्रसिद्ध बँड पथक, कलशधारी महिला यासह विविध देखाव्यांचा सहभाग राहणार आहे. तरी नागरिकांनी या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समिती अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.