ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कानपूर येथील घटनेविरोधात मुस्लिम समाजाचा मोर्चा

तहसीलदार राजेश भांडारकर यांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      कानपूर (उत्तर प्रदेश) येथे घडलेल्या घटनेविरोधात भद्रावतीतील मुस्लिम समाजातर्फे शांततापूर्ण मोर्चा काढून तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले. बाबू भाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी काढण्यात आलेल्या या मोर्चात मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भीम आर्मीचे शंकर मुन कार्यकर्त्यांसह प्रामुख्याने उपस्थित होते.

कानपूर येथे “आय लव्ह मोहम्मद” असे बोर्ड लावण्यात आले होते. मात्र स्थानिक पोलिसांनी त्यावर कारवाई करत विरोधी भूमिका घेतली. या कारवाईमुळे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचला असल्याचे मत निवेदनातून व्यक्त करण्यात आले आहे. पैगंबर-ए-इस्लाम यांचे अनुयायी असलेल्या लोकांच्या श्रद्धा व धार्मिक अभिव्यक्तीवर अन्यायकारक बंधने आणली जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना दिलेले मौलिक अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानता तसेच धर्म पालन करण्याचे स्वातंत्र्य या घटनेमुळे बाधित झाल्याचा आरोप करत आमचे निवेदन वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावे, कानपूर येथील घटनेत केलेल्या कारवाईबाबत आमचा विरोध असून सर्व नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी संविधानाच्या चौकटीत राहून आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी मुस्लिम समाजाने निवेदनातून केली आहे.

यावेळी तहसिलदार कार्यालय तसेच पोलिस स्टेशन येथे समाज बांधवांनी निवेदन देत आपला विरोध नोंदवला. संविधानाच्या चौकटीत राहून हा मोर्चा काढण्यात आला असून शांती व लोकशाही पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्याचे बाबू भाई सय्यद यांनी सांगीतले. प्रशासनाने तातडीने योग्य ती दखल घ्यावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये