
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना येथील तुकडोजी नगरातील २४ वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. विश्वास नरेंद्र मालेकर असे मृतकाचे नाव आहे. तर, सुनील पवार असे आरोपीचे नाव आहे.
सोमवारी सायंकाळी ६ वाजता विश्वास मालेकर याने धाब्यावर जातो, असे आपल्या आईला सांगून घरून निघाला. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह तुकडोजी नगर येथील हॉटेलच्या शेडमध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात विश्वास मालेकरचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. वणी रस्त्यावरील अवैध धाब्यांमुळे ही घटना घडल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
खून प्रकरणानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. संतप्त नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी धाबा बंद केल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर पोलिस निरीक्षक गाडे यांनी वणी रस्त्यावरील अवैध धाबा बंद करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आला.
मृतकाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून कोरपना पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी सुनील पवार याला शेरज येथून कोरपना पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली. पोलिस निरीक्षक गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक देवानंद केकण, प्रकाश राठोड, प्रभाकर जाधव, हवालदार बळीराम पवार, पंढरी सिडाम, साईनाथ जायभाये व पोलिस शिपाई गुणाजी यांनी ही कारवाई केली.