अवैध हातभट्टी दारू व्यावसायिक चार महिन्यांसाठी स्थानबद्ध
चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई

चांदा ब्लास्ट
अवैध हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतूक करणाऱ्या व १ पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या पळसगाव (जाट) सिंदेवाही येथील नरेंद्र श्यामराव अमरेश्वर या दारू व्यवसायिकाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करत चार महिन्यांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टींवर दारू निर्मिती, विक्री व वाहतूक या विरुद्ध मागील २ वर्षांपासून सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. सन २०२३-२४ या वर्षात अवैध दारू विरुद्ध ९५१गुन्ह्यांची नोंद करून ७६१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ४२ वाहने जप्त करून ९९ लाखांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला आहे. तसेच १ पेक्षा ज्यास्त वेळा अश्याच प्रकारचे गुन्हे वारंवार करणाऱ्या १५६ आरोपींविरुद्ध कलम ९३ अंतर्गत प्रस्ताव तयार करून त्यातील ६२ आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र सुद्धा घेण्यात आले आहे.
मात्र याउपरही अवैध दारू व्यवसाय सुरूच ठेवणाऱ्या ४ आरोपींविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई प्रस्तावित केली असता नरेंद्र श्यामराव अमरेश्वर या इसमाविरुद्ध ४ महिन्यांसाठी स्थानबद्धतेचा आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पारीत केला आहे. एखाद्या दारू व्यावसायिकाविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश देण्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.
यापुढेही या स्वरूपाची सक्त कारवाई अवैध दारू व्यवसायाशी निगडीत व्यक्तींविरुद्ध सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन विभागाने स्पष्ट केले आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, तसेच संचालक प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त अनिल चासकर, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक संजय पाटील यांच्या अधिपत्याखाली ईश्वर वाघ, अभिजित लिचडे, चेतन खारवडे, मोनाली सुराडकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी केली.