रामबाग मैदानाची आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी
खोदलेला खड्डा बुजवण्यास सुरुवात; मैदान पूर्ववत करण्याचे काम सुरू

चांदा ब्लास्ट
रामबाग मैदानावर जिल्हा परिषदेची इमारत उभारण्याच्या प्रस्तावावर काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आज आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष रामबाग मैदानावर जाऊन पाहणी केली. त्यांनी मैदानात खोदलेल्या भागाची तपासणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना मैदान तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मैदान पूर्ववत करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे.
पाहणीदरम्यान आमदार जोरगेवार म्हणाले, कालच्या बैठकीत प्रशासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका घेतली. रामबाग मैदान अबाधित ठेवण्याचा निर्णय हा जनतेच्या एकजुटीचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा विजय आहे. आता इथे झालेली हानी तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे.
रामबाग मैदानात खोदलेला खड्डा युद्धपातळीवर बुजवण्याचे काम त्वरित पूर्ण करा. मैदानाची जुनी रचना कायम राखण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात यावी, असेही आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.
आमदार जोरगेवार यांच्या पाहणीमुळे आणि कामाला मिळालेल्या गतीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. स्थानिक रहिवासी, खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांनी आमदारांचे आभार मानले. आमचा आवाज ऐकला गेला, हे खूप महत्त्वाचे आहे. आता मैदान पुन्हा आपल्या मुलांसाठी आणि खेळाडूंना उपलब्ध होईल, ही आनंदाची गोष्ट आहे,” असे नागरिकांनी सांगितले.
रामबाग मैदान हे चंद्रपूर शहराचे फुफ्फुस आहे. ते अबाधित राहावे, यासाठी सुरू असलेला संघर्ष आता यशाच्या दिशेने जात आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे व नागरिकांच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले आहे. मैदानाच्या दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण होऊन ते पूर्ववत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पाहणीवेळी दशरथसिंह ठाकूर, मनोज पॉल, सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, माजी नगरसेवक प्रदीप किरमे यांच्यासह खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.