ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोकाट जनावरांचा उच्छाद ; शेतकऱ्यांच्या पिकांवर संकट!

दिवसरात्र शेतात घुसून पिकांची नासाडी ; लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती — कोरपणा नगरपंचायतीने तातडीने कारवाई करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा शहर व परिसरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना बसत आहे. रक्ताचे पाणी करून, हजारो रुपये खर्च करून उभे केलेले पीक मोकाट जनावरांच्या कळपाकडून क्षणार्धात उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

शेतामध्ये घुसणाऱ्या गाय, बैल, म्हैस आदी मोकाट जनावरांमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. शेतीचा वाढता खर्च, महागडी बियाणे, खते, औषधफवारणी आणि मजुरी यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आता मोकाट जनावरांच्या उपद्रवाचे नवे संकट ओढवले आहे.

मालक मोकळे; नुकसान मात्र शेतकऱ्यांचे!

जनावरांना मोकळे सोडून देणाऱ्या मालकांवर नियंत्रण नसल्याने हा प्रकार वाढत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. जनावरांचे मालक जबाबदारी झटकतात आणि नुकसान भरपाईची झळ मात्र शेतकऱ्यांना सोसावी लागते, अशी संतप्त भावना परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे.

याशिवाय रस्त्यावर मोकाट जनावरे बसल्याने वाहनचालकांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरपंचायतीने ‘मोकाट जनावर हटाव’ मोहीम राबवावी

कोरपणा नगरपंचायतीने तातडीने मोकाट जनावरांविरोधात विशेष मोहीम राबवून जनावरे पकडावीत, त्यांची योग्य व्यवस्था करावी आणि जनावरे मोकळी सोडणाऱ्या मालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे करण्यापेक्षा नुकसान होण्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. नगरपंचायतीने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल न घेतल्यास शेतकऱ्यांचा संताप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

“आमच्या घामाची कमाई वाचवा; मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा!”

अशी आर्त हाक आता कोरपणा परिसरातील शेतकरी नगरपंचायतीकडे देत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये