प्रेरणा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा शिबीराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व कळावे,तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या अडचणीचे योग्य रीतीने नियोजन व्हावे.यासाठी प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर द्वारे स्पर्धा परीक्षा शिबिराचे आयोजन ७ एप्रिल २०२५ रोज सोमवारपासून महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे. सदर स्पर्धा परीक्षेला आर्यभट्ट अकॅडमी नांदेड येथील विषय तज्ञांच्याद्वारे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षेतील पोलीस भरती अग्नीवीर व आर्मी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शारीरिक चाचणीचे मार्गदर्शन सुद्धा सदर स्पर्धा परीक्षा शिबिराच्या माध्यमातून मिळणार आहे.
सदर स्पर्धा परीक्षेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर्यभट्ट अकॅडमी नांदेडचे संचालक सुमित राठोड तसेच प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे यांच्याद्वारे मराठी व्याकरण, गणित,बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान या विषयाचे मार्गदर्शन होणार असून,तसेच आकाश चव्हाण यांच्या द्वारे विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणीचे मार्गदर्शन मिळणार आहे. सदर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर हे संपूर्ण एक महिना महाविद्यालया द्वारे राबविण्यात येणार आहे. सकाळी ६ वाजता नियमितपणे विदर्भ महाविद्यालयाच्या मैदानावर शारीरिक चाचणीचे मार्गदर्शन होणार असून सकाळी ८ वाजता पासून महाविद्यालयात स्पर्धा परीक्षातील विविध विषयाचे वर्ग होणार आहे.
गडचांदूर भागातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील महाविद्यालयीन विध्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील विविध नोकरीच्या संधी या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन या शिबीराच्या माध्यमातून होणार आहे.या सुवर्णसंधीचा लाभ सर्व विध्यार्थ्यानी घेण्याचे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात येत आहे.