ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोलामांच्या मुलांना मिळताहेत पडक्या खोलीतून शिक्षणाचे धडे

धोकादायक खोलीत विद्यार्थी गिरवतात धडे, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- एकीकडे शहरातील विलोभनीय शाळेचे दृश्य तर दुसरीकडे मात्र जुन्या पध्दतीने बांधण्यात आलेल्या निकृष्ट पध्दतीच्या जिल्हा परिषद शाळा तेही पडक्या अशा धोकादायक वर्ग खोलीत बसून दुर्घटनेच्या सावटाखाली कोलामाची मुले शिक्षण घेत असल्याचा गंभिर प्रकार समोर आला आहे.शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नुसते अभ्यासक्रम महत्त्वाचे नसून त्यांना चांगली शाळा परिसरातील रमणीय वातावरण निर्माण करणेही तेवढेच गरजेचे असताना शिक्षण विभागाकडून मात्र जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

           जिवती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या भुरीयेसापुर या कोलामगड्यावरील जिल्हा परिषद शाळा ही गेल्या पाच वर्षापासून धोकादायक झालेली आहे,शाळेचा संपूर्ण स्लॅप गळत आहे, स्लॅपला भेगा पडलेल्या आहेत. पूर्ण इमारत ही खचलेली आहे यासंदर्भात गावातील गावकऱ्यांनी पंचायत समिती जिवती येथील गटविकास अधिकारी यांना अनेकदा निवेदन दिलेली आहेत.

मात्र अद्यापही या गंभीर बाबीकडे शिक्षण विभागाने लक्ष दिले नाही.चौथ्या वर्गापर्यंत असलेल्या या शाळेची पटसंख्या २४ असून २०२० पासून या शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे.लांबोरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भुरीयेसापूर गावात संपूर्ण कोलाम समाज राहत असून पेसा अंतर्गत गाव आहे.शाळा निर्लखीत करून नविन वर्गखोलीची निवेदनातून मागणी केली मात्र अजूनही कुणीच या गंभिर बाबींची दखल घेतली नाही पावसाळ्यात या वर्गखोलीत एक दीड फूट पावसाचे पाणी साचते अशा वेळेस मुलांना बसण्यासाठी गावातील समाज मंदिर किंवा मारुतीच्या पारावर बसावे लागते. अशाही परिस्थितीमध्ये या शाळेतील मुले अत्यंत जिज्ञासू वृर्तीने शिक्षणाची धडे गिरवत असतात.

परंतु या संदर्भाने लोकप्रतिनिधींनीही जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांनाही वेळोवेळी निवेदन देऊन सूचना केल्यात. परंतु अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.पुढील पावसाळ्यात तरी ही शाळा पाडून नवीन शाळा बनेल काय ?नाही तर अजून वरून गळते खालून भिजते. अशाच परिस्थितीत मुलांना शाळेत जावे लागेल की काय? अशी चिंता पालक वर्गाना व तेथील सामाजिक कार्यकर्ते मारुती कोडापे यांनी व्यक्त केलेली आहे.

या संदर्भात त्यांनी निवेदनही दिलेले आहे शाळेची इमारत न झाल्यास संपूर्ण विद्यार्थी आणून पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात बसवण्यात येईल असा इशारा त्यांनी एका निवेदनाद्वारे दिलेला आहे, यावर शिक्षण विभाग काय तोडगा काढेल ?याकडे संपूर्ण गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये