ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोवंश तस्करी अन् अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचा दणका; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंडपिपरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; बोलेरो पिकअपमधून चार गोवंशीय जनावरे तर वढोलीत रेतीने भरलेला ट्रॅक्टर जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी पोलिसांनी अवैध गोवंश वाहतूक आणि अवैध रेती वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल ९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १४ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवायांमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

गोंडपिपरी पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार ड्युटीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा भनारहेटी गावाजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी विठ्ठलवाडा मार्गे येणाऱ्या एमएच._३४ सीक्यू_१२२९ क्रमांकाच्या बोलेरो पिकअप वाहनाला संशयावरून अडवून पोलिसांनी तपासणी केली. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल चार गोवंशीय जनावरे आढळून आली.

या जनावरांच्या वाहतुकीबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच जनावरांना वाहनामध्ये दाटीवाटीने कोंबून चारा-पाण्याची योग्य व्यवस्था न करता वाहतूक करण्यात येत असल्याचेही आढळले. या कारवाईत दोन बैल, एक लाल रंगाचा बैल आणि एक लाल रंगाची गोरी अशी जनावरे जप्त करण्यात आली. जप्त गोवंशाची पुढील वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित ठिकाणी देखभालीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

या कारवाईत चार गोवंशीय जनावरांसह सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी वाहनचालक प्रफुल्ल राजाजी गद्दे (वय ३३), रा. नांदगाव, ता. मूल तसेच करण सुधाकर झाडे (वय २३), रा. चेकविठलवाडा, ता. गोंडपिपरी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ मधील ५ (अ), ५ (ब), ९, ११ तसेच प्राण्यांचा छळ अधिनियम १९६० मधील संबंधित कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, याच दिवशी गोंडपिपरी पोलिसांनी मौजा वढोली येथील ग्रामपंचायतीसमोर अवैध्य रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथक व पंच घटनास्थळी गेले असता महिंद्रा युवो टेक प्लस ५७५ डीआय ट्रॅक्टर क्रमांक एमएच_३४, बीटी ३०३६ आणि त्यास जोडलेली ट्रॉली क्रमांक एमएच_३४, सीबी ९९८३ आढळून आली. ट्रॉलीमध्ये रेती भरलेली होती.

 चौकशीदरम्यान चालक गुरुदास सुन्दरशा मडावी (वय ३६), राह. फुरडी हेटी ता. गोंडपिपरी याने सदर रेती मौजा तारसा नदीघाटातून भरून वढोली येथे टाकण्यासाठी आणल्याचे सांगितल्याची नोंद आहे. ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती असल्याचे आढळून आले. रेतीची अंदाजे किंमत १० हजार रुपये, तर ट्रॅक्टर_ट्रॉलीची अंदाजे किंमत ५ लाख रुपये, असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी ट्रॅक्टर चालक गुरुदास सुन्दरशा मडावी तसेच ट्रॅक्टर मालक मंगेश सुधाकर लखमापूरे राह. तारडा ता. गोंडपिपरी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरच्या दोन्हीही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपअधीक्षक सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे, GPSI वसंत कोसमशिले, मुख्य अंमलदार मुनेश्वर रात्रे, पोअं. अतुल तोडासे, तिरुपती गोडसेलवार, प्रवीण कडुकर यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये