शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) हे एक अत्यंत प्रभावी तंत्रज्ञान आहे, जे मानवाच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडवू शकते. त्याचा वापर विविध क्षेत्रांमध्ये वेगाने वाढत आहे. त्यामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर व कार्यक्षम बनत आहे. आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) बाबत जाणून घेऊया. AI म्हणजे संगणकाला किंवा यंत्रांना मानवा प्रमाणे विचार करण्याची, शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणे होय.हे तंत्रज्ञान संगणक,विज्ञान , गणित व तंत्रज्ञानाच्या विविध शाखांमध्ये वापरले जाते.AI च्या माध्यमातून यंत्रे स्वतःहून शिकू शकतात, अनुभवातून सुधारणा करू शकतात . कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अलीकडील अद्ययावत आणि विकसित आवृत्ती मुळे तंत्रज्ञानाच्या कक्षा लक्षणीय स्वरूपात रुंदावल्या गेल्या आहेत.परंतु,असे असले तरी कृत्रिम बुद्धिमत्तेकडे एक दुधारी तलवार म्हणून पाहिले जाते.
कृत्रिम बुद्धिमत्तेने सगळ्या क्षेत्रात शिरकाव केला असून त्यातून वस्तू,उत्पादने आणि सेवा अधिक अद्ययावत झाल्या आहेत. आता हळूहळू AI चा उपयोग अध्ययन – अध्यापन प्रक्रियेत अर्थातच शिक्षण क्षेत्रात सुरू झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या वापरातून विद्यार्थ्यांसाठी अध्ययन – अध्यापन प्रक्रिया खूप सुलभ करता येते.सर्वात पहिला अनुप्रयोग म्हणजे शिक्षणाचे वैयक्तिकरण.वर्गातील तीस ते साठ विद्यार्थ्यां च्या शैक्षणिक गरजांचे आकलन करणे एका शिक्षकाला अवघड आहे.
कारण प्रत्येक विद्यार्थी हा जन्मतः वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. Artificial intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या वापराने प्रत्येक विद्यार्थ्यांचे सामर्थ्य व दुर्बलता ,अध्ययन गती यांचा विचार करून शिक्षण देता येईल. प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनाची शैली आणि त्याला अवगत असलेले ज्ञान, यांवर आधारित शिक्षण देण्यास उपयोगी ठरेल. मूल्यांकनातून शिक्षकांना योग्य अभिप्राय मिळविण्यासाठी AI लागू पडते. उदाहरणार्थ, अनेक विद्यार्थ्यांनी एखाद्या विषयाच्या परीक्षेत लिहिलेल्या उत्तराच्या विश्लेषणावरून तो विषय त्यांना बरोबर समजला किंवा नाही याची माहिती AI शिक्षकांना देऊ शकते.ज्यावरून शिकविण्याची पद्धत , शैली ,वेग आणि अध्यापनाचे साधने यात योग्य बदल करणे साध्य होईल.शिक्षणातील AI विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा नुसार शिक्षण सामग्री तयार करून वैयक्तिक शिक्षण सुलभ करते,ज्यामुळे विद्यार्थी,शिक्षक आणि संसाधनांची कमतरता असलेल्या शाळांना फायदा होतो.
विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमता आणि शब्दसंग्रह वाढविण्यासाठी सुध्दा Artificial Intelligence चा वापर सुरू झाला आहे .AI प्रणालीच्या मदतीने कार्यालयीन कामकाज यामध्ये गतिमानता येत आहे.शिवाय शैक्षणिक प्रशासनात जसे की,अभ्यासक्रमाचे नियोजन,वेळापत्रक तयार करणे,वर्गखोल्या व प्रयोगशाळा यांचे योग्य उपयोजन ,वीज तथा पाणी यांचा योग्य वापर,माहितीचे विश्लेषण करून योग्य निर्णय घेणे,इत्यादी मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगी ठरत आहे.
परंतु,आपण AI चा वापर करत असताना त्याच्या सामाजिक ,नैतिक आणि गोपनीयतेच्या बाबतीत सतर्क असले पाहिजे.AI च्या भविष्यात अनेक नवीन संधी आणि आव्हाने असू शकतात व त्याच्या प्रभावी वापरासाठी योग्य नियमन ,जागरूकता आणि मार्गदर्शन आवश्यक आहे.