समर्थ कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे २४ सप्टेंबर रोजी समर्थ कृषी महाविद्यालयातील एनएसएस युनिट तर्फे राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. दीपक अनोकर यांच्या हस्ते भारताचे कृषी महामानव व समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दीपक अनोकर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी भूषवले. एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश चगदळे यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी एनएसएस स्वयंसेवकांच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये सेवा भाव, सहानुभूती, जबाबदारी आणि मानवी प्रतिष्ठा या मूल्यांची जपणूक होते, जे एनएसएस तत्वज्ञानाचे मूळ आहे.
प्रा. योगेश चगदळे यांनी एनएसएसच्या ध्येयधोरणांवर भाष्य करताना सांगितले की, ८ कड्या असलेले कोणार्क व्हील हे दिवसाचे २४ तास राष्ट्रसेवेच्या सज्जतेचे प्रतीक आहे. बॅजमधील लाल रंग स्वयंसेवकांची ऊर्जा व उत्साह दर्शवितो, तर निळा रंग विश्वाच्या व्यापकतेचे प्रतीक आहे, ज्यातून स्वयंसेवक संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी योगदान देत असतात.
या कार्यक्रमाचे औपचारिक आभार प्रदर्शन प्रथम वर्षातील विद्यार्थी ओम वायाळ यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन एनएसएस स्वयंसेवकांनी यशस्वीपणे पार पाडले.
या प्रसंगी सर्व प्राध्यापकवृंद, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.