सणासुदीच्या काळातही विजाभज आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित
आश्रमशाळा वेतनासाठी तरतूद द्या - आ. अडबाले यांचे प्रधान सचिवांना निवेदन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : राज्यातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे माहे जुलै व ऑगस्टचे वेतन अजूनही झालेले नाहीत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे शासनाने माहे ऑगस्टचे वेतन गणेश चतुर्थीपूर्वी करण्याचे आदेश काढलेले असतांना अपुऱ्या तरतुदीमुळे संपूर्ण राज्यातील विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे जुलैचेच वेतन झालेले नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. माहे जुलै व ऑगस्टच्या वेतनासाठी भरीव तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी इतर मागास बहुजन कल्याण व वित्त विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून मागणी केली आहे.
इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आश्रमशाळांचे वेतन हे नेहमीच एक ते दोन महिने उशिराने होत असते. दोन महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांची गृह कर्जे, वाहनकर्जे, एलआयसीचे हप्ते व बँकांच्या इतर कर्जांचे हप्ते यावर बँकांना अतिरिक्त व्याजाचा भरणा करावा लागतो. सणासुदीचे दिवस असूनही असेच पगार उशिरा होत राहिले तर बँका कर्मचाऱ्यांच्या एकाच महिन्याचे पगारातून दोन दोन कर्जाचे हप्ते कपात करतात परिणामी कर्मचाऱ्यांच्या हातात दमडीही शिल्लक राहत नाही. त्यामुळे आश्रमशाळा कर्मचारी सतत आर्थिक विवंचनेत असतो.
सणासुदीचे दिवस असल्यामुळे जुलै व आगष्टचे वेतन अनुदान तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण व वित्त विभाग यांना पत्र देऊन केलेली असून सर्व कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.