ब्रह्मपुरीतील डाक विभागाच्या रक्कमेवर उप डाकपाल यांचा डल्ला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- पोस्ट ऑफिस किंवा बँकेतील रक्कमेची अफरातफर केल्याच्या अनेक घटना सद्यस्थितीत घडून येत आहेत. तेथीलच अधिकारी किंवा कर्मचारी सदर रक्कमेची अफरातफर करणारे असतात. तसंच काहीसा प्रकार ब्रह्मपुरी तालुक्यात सुद्धा पहावयास मिळत आहे. ब्रह्मपुरी येथील पोस्ट ऑफिस मध्ये उप डाकपाल या हुद्द्यावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने ‘कुंपणच शेत खातो’ या म्हणी प्रमाणे काम करीत भारतीय डाक विभागाच्या कोषागारातील रक्कमेवर डल्ला मारून, रक्कम फस्त केली. सदर बाब उघडकीस आल्यानंतर उप विभागीय डाक निरीक्षक चांदा पूर्व उपविभाग ब्रह्मपुरी यांनी रोकड गहाळ केल्याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
फिर्यादी रवींद्र भस्मे उपविभागीय डाक निरीक्षक चांदा पूर्व उपविभाग ब्रह्मपुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून, ब्रह्मपुरी पोस्ट ऑफिस येथे कार्यरत तत्कालीन उप डाकपाल निलेश लिंगायत हे सुट्टीवर गेल्यामुळे त्यांचा पदभार प्रविण दिगांबर गराडे यांनी सांभाळला. प्रविण दिगंबर गराडे हे दिनांक 20 ऑगस्ट 2019 ते 9 जुलै 2022 पर्यंत तत्कालीन उप डाकपाल म्हणून ब्रह्मपुरी पोस्ट ऑफिस येथे कार्यरत होते. त्यांच्याकडे उप डाकपाल पदाव्यतिरिक्त ट्रेझरी, एमपीसीएम काऊंटर, सब अकाउंट या शाखेचा सुद्धा चार्ज होता. तत्कालीन काळात प्रविण गराडे यांनी ट्रेझरी मध्ये असलेल्या एकूण रक्कमेपैकी 1 लाख 98 हजार 965 रुपये एवढी रक्कम भारतीय डाक विभागाचा विश्वासघात करत परस्पर वापरले. सदर बाब तत्कालीन उप डाकपाल निलेश लिंगायत त्यांच्या लक्षात आली.
त्यांनी सदर बाब वरिष्ठ डाक अधिक्षक चंद्रपूर यांना कळविले. वरिष्ठ डाक अधिक्षक चंद्रपूर यांनी तत्कालीन उपविभागीय डाक निरीक्षक यांना चौकशीचे आदेश दिले. चौकशी अंती तत्कालीन उप डाकपाल प्रविण दिगंबर गराडे यांनी पदाचा दुरुपयोग करीत, भारतीय डाक विभागाच्या रोकडे मध्ये अफरातफर करून, शासकीय हिशोबातून 1लाख 98 हजार 965 इतकी रक्कम गहाळ करीत परस्पर वापरली व भारतीय डाक विभागाचा विश्वासघात केल्याचे सिद्ध झाले.
त्यामुळे आरोपी प्रविण दिगंबर गराडे तत्कालीन उप डाकपाल (सध्या डाक सहाय्यक चंद्रपूर सिटी उप डाकघर) याच्याविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता, कलम 409 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.