वाघाच्या हल्ल्यात वृद्ध इसमाचा मृत्यू कोंडेगाव येथील घटना
पाळीव गुरांसाठी चारा आणण्याकरिता गेल्याने घडली घटना : गावकऱ्यांमध्ये दहशत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आपल्या पाळीव गुरांसाठी गाव शिवारात चारा आणण्यासाठी गेलेल्या एका ७८ वर्षीय वृद्धावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना तालुक्यातील कोंडेगाव गावशिवारात दिनांक ३० रोज बुधवार ला दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. श्रीराम मडावी, वय ७८ वर्षे, राहणार कोंडेगाव असे या वृद्धाचे नाव आहे. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला.
या घटनेमुळे गावातील नागरिकात वाघाची चांगलीच दहशत बसली आहे. तालुक्यातील कोंडेगाव हे जंगल व्याप्त गाव आहे. घटनेच्या दिवशी मृतक श्रीराम मडावी हे गावालगतच्या शिवारात आपल्या पाळीव गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. चारा काढत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस व वन विभागाचे अधिकारी करीत आहे.