ताज्या घडामोडी

ऑक्टोबर महिन्यात लोकसभा पोटनिवडणूक? – काँग्रेस सह भाजपात रस्सीखेच

कोणाला मिळणार उमेदवारी? - सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्यास प्रतिभाताई सज्ज?

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

महाराष्ट्रातील पुणे व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता निर्माण झाली असुन भाजपाचे खा. गिरीश बापट व राज्यातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खा. बाळु धानोरकर ह्यांच्या निधनाने अनुक्रमे पुणे व चंद्रपूर हे मतदारसंघ रिक्त झाले आहेत. निवडणूक आयोगाने प्रशासनाला पोटनिवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पावसाळा संपताच व दिवाळीपूर्वीच म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता गृहीत धरल्या जात आहे. वास्तविक बघता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी उरला असल्याने पोटनिवडणूक होणार की नाही याबाबत संभ्रम असला तरीही मागील सार्वत्रिक निवडणुकीस सहा ते सात महिने शिल्लक असतानाच कर्नाटक मधे पोटनिवडणूक झाली होती त्यामुळे महाराष्ट्रातही तसेच होणार का? ह्याकडे इच्चुकांसह राजकीय पंडितांचे लक्ष लागले आहे.

चंद्रपूर मतदार संघ एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता इथे पक्षाने बैलाला जरी उमेदवारी दिली तरी निवडून येईल असे बोलल्या जायचे मात्र हंसराज अहिर ह्यांनी 1996 मधे हा भ्रम मोडुन काढत पहिल्यांदा बाजी मारली. त्यानंतर 2004, 2009 व 2014 मधे विजय प्राप्त करून मतदार संघावर भाजपाची मजबुत पकड निर्माण केली. मोदींच्या मागील कार्यकाळात मंत्रिपदही प्राप्त करून आपली राजकीय उंची सिद्ध केली मात्र 2019 च्या निवडणुकीत ऐनवेळी शिवसेनेतून आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करून बाळु धानोरकर ह्यांनी अनपेक्षितपणे तत्कालीन केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज ह्यांचा पराभव करून खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे ते राज्यातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार ठरले.

बाळु धानोरकर ह्यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या ह्या मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षात प्रचंड रस्सीखेच दिसुन येत असुन स्व. बाळु धानोरकर ह्यांच्या आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर ह्यांचा दावा सर्वाधिक प्रबळ मनाला जातो. पतीच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मतदार संघात सहानुभूतीच्या जोरावर आपण निवडून येऊ असा विश्वास त्यांना असला तरीही माजी पालकमंत्री व हेविवेट नेते विजय वडेट्टीवार ह्यांना आपल्या मुलीचे राजकीय स्थान मजबुत करायचे असल्याने ते सुद्धा स्वतः लोकसभेत जाण्यास इच्छुक असुन आपली विधानसभेची जागा शिवानी वडेट्टीवार ह्यांना सोपवून लोकसभेत जाण्यासाठी त्यांनी शरद खड्डू ठोकला आहे. तिसरीकडे मागील वेळी उमेदवारी जवळपास नक्की झालेले आताचे राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे हेसुद्धा इच्छुक असल्याचे बोलल्या जाते.

भाजपाचा विचार करता इथेही इच्छुकांची मुळीच वानवा नाही. माजी खा. हंसराज अहिर जरी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष असले तरीही आपल्या केंद्रातील संबंधांच्या बळावर पुन्हा एकदा दंड थोपटण्यास उत्सुक आहेत तर राज्यातील राजकारणात प्रतिस्पर्धा संपविण्याचा उद्देशाने भाजपचे राज्यातील हायकमांड वनमंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांना दिल्लीला पाठविण्यासाठी प्रयत्नरत असल्याचेही कळले असुन खुद्द सुधिर मुनगंटीवार हे सुद्धा दिल्लीवासी होण्याच्या मानसिकतेत असल्याचेही बोलल्या जाते.

मागील निवडणुकीत जातीय समीकरणाच्या बळावर बाळु धानोरकर लोकसभेत पोहचले होते तेच समीकरण साधण्याचा एक विचारप्रवाह भाजपा मधेही दिसुन येत असून त्या अनुषंगाने ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे सुत्र हलवित असल्याची कुजबुज सुरू असतानाच स्वतःला ओबीसी त्यातल्यात्यात कुणबी नेते म्हणून प्रस्थापित करू बघणारे प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे ह्यांनी ऐनवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या उपस्थितीत स्वतःच्या संस्थेच्या पटांगणात भव्य सभेत भाजपा प्रवेश केल्याने त्यांनाही वरिष्ठांकडून काही शब्द मिळाल्याचे संकेत मिळत आहे.

एकंदरीतच काँग्रेस असो वा भाजपा दोन्ही पक्षात उमेदवारांची संख्या मोठी आहे. दोन्ही पक्षांतील नेते जिल्ह्यातील दिग्गज समजले जातात त्यामुळे दोन्हीकडे प्रचंड रस्सीखेच व पर्यायाने पाडापाडीचे राजकारण होणार ह्यात शंका नाही. आ. प्रतिभा धानोरकर ह्या पतीच्या रिक्त जागेवर दावेदारी करून मतदारांच्या सहानुभूतीच्या बळावर लोकसभेत जाण्याचे स्वप्न रंगवत आहेत तर भाजपचे दिग्गज नेतेही दिल्लीवासी होण्यासाठी डावपेच आखत असले तरीही पोटनिवडणूक होणार का ह्याचा निर्णय मात्र निवडणूक आयोग घेणार असुन तसा निर्णय झाल्यास येता ऑक्टोबर महिना जिल्ह्यात राजकीय धुळवडीचा ठरू शकतो हे मात्र निश्चित.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये