डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा शांतता समितीची बैठक

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रॅली व उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज (दि. 13) नियोजन भवन येथे पार पडली.
यावेळी मंचावर मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, सहायक पोलिस अधिक्षक गौरव कायंदे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना मनपा आयुक्त श्री. नरेश म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनितित्त शहरात निघणा-या रॅलीकरीता मार्गावरील खड्डे बुजविण्याचे नियोजन करण्यात आले असून मनपाद्वारे सर्व वॉर्डात साफसफाई करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ अग्निशमन व्यवस्था, वैद्यकीय पथक तसेच रुग्णवाहिका ठेवण्यात येईल. या परिसरात फिरत्या शौच्छालयाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहणार आहे.
अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्री. कातकडे म्हणाले, अफवा निदर्शनास आली तर थेट पोलिसांशी संपर्क करावा. सर्व पोलिस निरीक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील वाहतुकीचे उत्तम नियेाजन करावे. जयंती उत्सव शांततेत आणि आनंदाने पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले, चंद्रपूर हा शांतताप्रिय जिल्हा आाहे. जिल्ह्याची ही पंरपरा कायम राखण्यासाठी प्रशासनासोबतच शांतता समितीच्या सदस्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
समितीच्या सदस्यांनी केलेल्या सुचना : 1) डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, 2) रात्रीच्या वेळी पुतळ्यावर चांगला प्रकाश पडण्यासाठी हॅलोजन लावावे, 3) उन्हाचा तडाखा पाहता रुग्णवाहिका तैनात असावी, 4) मोबाईल टॉयलेटची व्यवस्था असावी, 5) मनपाने अनधिकृत बॅनरवर कारवाई करावी, 6) अफवा पसरू नये यासाठी दक्षता घ्यावी, 7) लटकलेल्या विद्युत तारांचा योग्य बंदोबस्त करावा, 8) पुतळ्याजवळील निर्माल्याचे वेळोवेळी साफसफाई करावी, 9) रॅलीच्या मार्गाचे योग्य नियोजन व्हावे.



