ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवसाक्षर अभियान सर्वेक्षणावरती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनाचा बहिष्कार व आंदोलनाचा इशारा

अशैक्षणिक कामाचा बोझा नको,मुलांना शिकवू द्या.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

जिल्ह्यातील सरकारी शाळा आता ज्ञानाचे मंदिर कमी उपक्रमांच्या प्रयोगशाळा झाल्या आहेत. अनेक नवनवीन उपक्रम आणि अशैक्षणिक कामांनी शिक्षक त्रस्त झाले आहेत. यामुळे सर्रास गरिबांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे, याकडे कुणाचेही लक्ष नाही, अशी खंत प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती निमंत्रक मा. विजय भोगेकर यांनी सभेत व्यक्त केली.
प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती चंद्रपूर ची सभा नुकतीच पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यूडायस ताबडतोब भरा, युडायस प्लसमध्ये एकाच विद्यार्थ्यांची ४० मुद्यांवर माहिती, कुठलेही प्रशिक्षण न देता शिक्षकांच्या माथ्यावर शैक्षणिक पेट्या मारायच्या, रचनावाद, ज्ञानरचना वाद, पोषण आहाराची ग्रॅममध्ये नोंद करणे, आहाराच्या दररोज ऑनलाइन नोंदी ठेवणे, दोन रजिस्टर भरा, मंथली ऑनलाइन करा, रिकामे पोते जमा व परत करणे, आहार शिजविणाऱ्या महिलांच्या निवडीतील जबाबदारी स्वीकारणे, झाडे लावा, स्वच्छतागृह स्वच्छता, शाळेत पाण्याची व्यवस्था नाही तरी संपूर्ण स्वच्छता ठेवा. महिलांना आयडिया व्हिडिओ दाखविणे, निरक्षरांचा सर्वेक्षण करणे, नवसाक्षर शोध घेणे व विनामोबदला शिकविणे, अंगणवाडीला भेट देणे, अहवाल लिहिणे, ॲपवर अहवाल टाकणे आदी विविध उपक्रमांचा भार शिक्षकांवर लादण्यात आला आहे. अशा अनेक कामांमुळे आज शिक्षक बेजार झाला आहे. या सर्व बाबींचा परिणाम अध्यापन प्रक्रियेवर झाला आहे. कोरोनानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडलेली दरी बुजविणे सोडून गुरुजीला कारकून बनविले जात आहे. प्रशासनाने या सर्व बाबींची दखल घेऊन शिक्षकांना विद्यार्थ्यांना फक्त शिकवू द्यावे. अन्यथा रस्त्यावर उतरून पालकांसह आंदोलनाची भूमिका घेऊ, असा इशारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनानी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये