ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बांबू क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

वन अकादमीमध्ये जागतिक बांबु दिन

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्रात सर्वात जास्त बांबु चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळतो. यापूर्वी केवळ पेपर मील आणि घराच्या कुंपनासाठीच बांबुचा उपयोग व्हायचा. अतिशय शोधक, कलात्मक आणि नाविण्यपूर्ण संकल्पनेतून बांबुचा उपयोग केल्यास चंद्रपूर जिल्हा बांबु क्षेत्रात पायोनिअर ठरू शकतो, त्यादृष्टीने वन विभागाच्या अधिका-यांनी सुक्ष्म नियोजन करावे, अशी अपेक्षा राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

जागतिक बांबु दिनानिमित्त वन अकादमी येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक अविनाशकुमार, माजी भाजपा महानगराचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, रमेशकुमार यांच्यासह महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळाचे पदाधिकारी, वनविभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

बांबु हा आधूनिक कल्पवृक्ष आहे, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण संस्था (बी.आर.टी.सी.) उभारण्यात आली असून या संस्थेला गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न करण्यात आले आहे. येथे मिळणा-या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बांबु क्षेत्रात रोजगार उपलब्ध होत आहे. ही संस्था उत्तमोत्तम आणि अप्रतिम करण्यावर आपला भर आहे. त्यासाठी बांबु संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने विविध ॲप विकसीत करावे आणि त्या ॲपच्या माध्यमातून ज्ञानवर्धक काम जगात कसे पाठविता येईल, याबाबत नियोजन करावे.

तसेच बी.आर.टी.सी. ने एक स्वतंत्र वेबसाईट तयार करावी. बांबु क्षेत्रात काम करणा-या व्यावसायिकांना प्रशिक्षण, शिक्षण आणि उद्योगासंदर्भात ही वेबसाईट मार्गदर्शक ठरली पाहिजे. जिल्ह्यात टिश्यु कल्चर लॅबला मंजूरी मिळणार असून 100 प्रकारच्या बांबुचे उद्यान चंद्रपुरात साकारण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
तत्पुर्वी वृक्षारोपण, प्रदर्शनीची पाहणी करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांबुपासून तयार केलेला केक कापून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच वनमंत्र्यांच्या हस्ते बांबु क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या बांबुटेक ग्रीन सर्व्हिसेस, अवजात इंजिनियर्स, बास विथ नेचर प्रा. लि., अभिसार इनोव्हेशन, सामूहिक उपयोगिता केंद्र यांच्यासह हस्तशिल्प निदेशक किशोर गायकवाड, मिनाक्षी वाळके, अन्नपूर्णा धुर्वे, निलेश पाझारे, अनिल डाहागावकर यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांबु संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक अविनाशकुमार यांनी केले.

बांबू हे चंद्रपूरचे ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ : केंद्र सरकारच्या ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ अंतर्गत आपल्या जिल्ह्यातील बांबु हस्तशिल्पकलेचे अतिशय आकर्षक दुकान नागपूर, चंद्रपूर आणि बल्लारशा या रेल्वे स्टेशनवर असावे. बांबुपासून उत्तम वस्तुंची निर्मिती आणि त्यासाठी उत्तम बाजारपेठ असली तर देशाच्या इतर भागात चंद्रपूरचा बांबु पोहचविण्यास मदत होईल.

बांबुचा तिरंगा आणि डायरी चंद्रपूरची शान : बांबुपासून तयार करण्यात आलेला लाकडी तिरंगा आणि डायरी ही चंद्रपूरची शान आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयात चंद्रपूरच्या बांबुपासून तयार केलेला 5 फुटांचा ध्वज अतिशय डौलाने उभा आहे.

365 ही दिवस बांबु वाढीस चालना देण्याचा संकल्प : जागतिक बांबु दिवस केवळ एक दिवस साजरा करून चालणार नाही, तर 365 ही दिवस बांबुपासून रोजगार, विकास आणि उपजिविकेचा मार्ग शोधण्यासाठी चिंतन करून संकल्प करण्याचा हा दिवस आहे, असेही वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये