एसटी भाडे दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार)आक्रमक
दरवाढीचे परिपत्रक फाडून केला निषेध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटीची सेवा उपलब्ध असून सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी आहे. एसटी गाड्याची केलेली तिकिट दर वाढ तातडीने मागे घ्या आणि जनतेची लूट थांबवा,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत स्थानिक बस स्थानकात भाडे दरवाढीचे परिपत्रक फाडून निषेध आंदोलन केले.
एसटी महामंडळाने नुकतीच एसटी तिकीटात दरवाढीची घोषणा केली. त्यामुळे राज्यभरात वादाचा बिगुल वाजला. एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झाले आहे. देऊळगाव राजा बस स्थानकात एसटी भाडे दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाडेवाढ परिपत्रक फाडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले.दरम्यान आंदोलकांनी ही भाडेवाढ त्वरीत मागे घेण्याची मागणी केली आहे.ग्रामीण भागातील जीवनवाहिणी असलेल्या एसटीच्या तिकीट दरात १४.९५ टक्के वाढ झाली. राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालक आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील समितीने भाडेवाढीला मंजूरी दिली.अनेक मोठे मोठे आश्वासने देऊन महायुती सरकार सत्तेत आलं. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्यांची काम करण्याऐवजी आता त्यांची छळवणूक सुरू केली आहे.
एकीकडे लाडक्या बहिणींचे लाड करायचे तर दुसरीकडे एसटीची भाडे वाढ करायची.एसटीचे भाडे वाढ ही सर्व सामान्यांचे कंबरडे मोडणारे असल्याचा आरोप करीत या भाडेवाडीला तीव्र विरोध करीत भाडेवाढ दर परिपत्रक फाडून तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, राजू शिरसाठ, विधानसभा कार्याध्यक्ष रवी इंगळे,शहराध्यक्ष विजय खांडेभराड, युवक शहराध्यक्ष अभिनव खांडेभराड, जनार्दन मगर, अरुण मोगल, गणेश सवडे,सौ. अलकाताई जायभाये, विष्णू रामाने, जानार्धन मगर, विलास खराट, नवनाथ गोमधरे, रफिक भाई,इस्माईल मामू, मंगल अंभोरे, संदीप कटारे, गणेश शिंदे, कारभारी झगरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते.