राखी अभियानाद्वारा चंद्रपुरातून मुख्यमंत्र्यांना पाठविणार दहा हजार राख्या !
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचा अनोखा उपक्रम ; "नको ओवाळणी, नको खाऊ, जुनी पेंशन द्या, एकनाथ भाऊ!"
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना यावर्षी २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२३ पर्यंत “OPS राखी अभियान” राबवित आहे या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील महिला कर्मचारी भगिनी, पुरुष कर्मचाऱ्यांची पत्नी व बहीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी पाठवून ओवाळणीच्या स्वरूपात आमचं जीवन सुरक्षित करण्यासाठी जुनी पेंशन लागू करण्याची मागणी सरकारकडे करणार आहे.
नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना बंद करण्यात आली असून अन्यायकारक डिसीपीएस/एनपीएस योजना बळजबरीने लादण्यात आली आहे. तेव्हापासून राज्यातील कर्मचारी मोठया संख्येने आंदोलन, मोर्चे, पायी दिंडी, उपोषण यांच्या माध्यमातून लढा देत आहे.मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे लढ्याला अद्यापही यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे यंदा रक्षाबंधनाचे औचित्य साधत जनतेच्या मनातील शासनाला जुनी पेंशन योजना लागू करण्याचे साकडे राज्यातील महिला पेंशन फायटर्स करणार आहेत. यंदा रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून जुनी पेंशन हवी असा हट्ट महिला कर्मचारी भगिनी सत्ताधारी भावांना करणार आहेत.
◆ राज्यातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचे भाऊ म्हणून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पेंशनची ओवाळणी मागण्यासाठी राखी हे प्रतीक मानून पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. भाऊ म्हणून बहिणीच्या रक्षणार्थ साथ देतील अशी अपेक्षा आहे.
– पौर्णिमा तागडे,जिल्हा महिला उपाध्यक्ष म.रा.जु.पे.संघटना चंद्रपूर
◆ महाराष्ट्र शासनाने जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी समिती नेमली होती, या समितीला नुकतीच मुदतवाढ देण्यात आली परंतु निर्णय झालेला नाही. या अभियानाद्वारे पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांना जुन्या पेंशनची मागणी केली जाणार आहे. तेव्हा प्रत्येक महिला कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या पत्नी व मुलींनी यात सहभाग घ्यावा.
– विपीन धाबेकर, जिल्हाध्यक्ष म.रा.जु.पे.संघटना चंद्रपूर