ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ताडोबा_अंधारी व्याघ्र प्रकल्पात अभ्यास दौरा संपन्न

कोठारी वनपरिक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्षांचा समावेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ मध्य चांदा वनविभागांतर्गत कोठारी वनपरिक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या (JFMC) अध्यक्षांसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. ताडोबाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मा. प्रभू नाथ शुक्ल यांचे सहकार्याने व कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन कातकर यांच्या संकल्पनेतून या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.

या अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या अध्यक्षांना वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, जैवविविधता व्यवस्थापन, स्थानिक लोकसहभाग तसेच वनांवर आधारित शाश्वत उपजीविकेच्या संधींबाबत प्रत्यक्ष माहिती मिळवून देणे हा होता.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा देशातील महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असून, येथील वन्यजीव संवर्धन, अधिवास व्यवस्थापन, वनसंरक्षण आणि स्थानिक समुदायांचा सहभाग या बाबींचा अभ्यास करण्याची संधी समित्यांच्या अध्यक्षांना या दौऱ्यातून उपलब्ध झाली.

या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून वनसंवर्धनात स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग वाढविणे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती करणे, वनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन करणे तसेच गावपातळीवर पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे याबाबत विशेष भर देण्यात आला.

“वनांचे संरक्षण आणि संवर्धन हे केवळ वनविभागाचे कार्य नसून स्थानिक ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातूनच प्रभावी वनव्यवस्थापन शक्य आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समित्या या वनविभाग आणि ग्रामस्थ यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत,” असा संदेश या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने देण्यात आला.

या दौऱ्यामुळे समित्यांच्या अध्यक्षांना वन्यजीव संवर्धन व वनव्यवस्थापनाबाबत नवीन दृष्टिकोन मिळण्यास मदत होणार असून, ताडोबातील अनुभवांचा उपयोग कोठारी वनपरिक्षेत्रातील गावांमध्ये लोकसहभागातून वनसंवर्धनाच्या विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी होणार आहे.

संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन मध्य चांदा वनविभागातील कोठारी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्रधिकारी रुंदन कातकर यांच्या वतीने करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात समिती अध्यक्ष यांनी हिरहिरीने सहभाग घेऊन अभ्यास दौरा यशस्वी केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये