ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुष्काळाच्या संकटात पाणी जपून वापरा !

टंचाई टाळण्यासाठी तलाव, नाले आणि जलस्रोतातील पाण्याचा उपसा थांबविण्याचे तहसीलदार शुभम बहाकर यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

 गोंडपिपरी :_ यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी हिरवीगार डोलणारी पिके वाळून जात आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना आता पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. यामुळे येत्या काळात पाण्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. यासोबतच तलाव, नाले आणि जलस्रोतांमधील उपलब्ध पाण्याचा अनावश्यक उपसा टाळावा आणि पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन गोंडपिपरीचे तहसीलदार शुभम बहाकर यांनी केले आहे.

गोंडपिपरी तालुक्यात यंदा पावसाची अनियमितता आणि दुष्काळी परिस्थितीमूळे शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. उभी पिके पाण्याअभावी करपल्याने शेतकरी संकटात आहे. या स्थितीत उपलब्ध जलसाठ्यांचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. शेतीच्या नुकसानीसोबतच आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून पाणीटंचाईचा आढावा घेण्यात येत आहे.

तहसीलदार शुभम बहाकर यांनी टंचाई परिस्थितीचा आढावा घेत उपलब्ध पाणीसाठ्याचे संरक्षण आणि पाणीटंचाईवरील उपाययोजनांच्या अनुषंगाने नुकतीच माहिती दिली. येत्या दिवसांत पाण्याची कमतरता जाणवू नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गावोगावी असलेले तलाव, नाले, लहान जलसाठे आणि इतर नैसर्गिक जलस्रोत हे केवळ माणसांसाठीच नव्हे, तर पशुपक्षी आणि वन्यप्राण्यांसाठीही आधार आहेत. दुष्काळी परिस्थितीत या जलस्रोतांमधील पाणी कमी झाल्यास मुक्या जनावरांसमोरही पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, तेथील पाणी विनाकारण उपसून वाया घालवू नये. पाणीसाठा टिकवून ठेवण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन तहसीलदारांनी यावेळी केले.

पाणी ही निसर्गाने दिलेली अमूल्य ठेव आहे. दुष्काळाच्या काळात त्याचे महत्त्व अधिकच आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे, गरजेपुरतेच पाणी वापरणे, घरगुती वापरातील पाण्याची बचत करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण करणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. केवळ प्रशासनाच्या उपाययोजनांवर विसंबून न राहता नागरिकांनीही पाणी बचतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत तहसीलदार बहाकर यांनी व्यक्त केले.

दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही जबाबदारीने वागावे, पाण्याचा प्रत्येक थेंब जपावा आणि उपलब्ध जलसाठ्यांचे संरक्षण करावे, असे आवाहन तहसीलदार शुभम बहाकर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये