ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चेकपिपरीत श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा देवस्थानात धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी!

घटस्थापना, पालखी पदयात्रा, पारंपरिक भजन, कीर्तनासह महाप्रसाद व घुगरीकाला कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यातील चेकपिपरी येथील श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा देवस्थानात गुरुवार आणि शुक्रवार, दिनांक १५ व १६ ऑक्टोबर २०२६ रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त घटस्थापना, पालखी पदयात्रा, पारंपरिक गायत्री यज्ञ, कीर्तन, महाप्रसाद व घुगरीकाला तसेच भजन संध्या अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. या धार्मिक सोहळ्यात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांमुळे चेकपिपरी परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून, भाविकांना भक्तिरसाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

*विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*

गुरूवार, १५ ऑक्टोबर रोजी पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. सकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी मारोती महाराज यांच्या हस्ते हनुमान मंदिराच्या ठिकाणी घटस्थापना करण्यात येणार आहे. शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजून १६ मिनिटांनी चेकपिपरी गावातून पालखी पदयात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजून १६ मिनिटांपासून ११ वाजून १६ मिनिटांपर्यंत पारंपरिक गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक विधीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

*कीर्तन, महाप्रसाद व भजन संध्येची पर्वणी*

सकाळी ११ वाजून १६ मिनिटांपासून दुपारी २ वाजून १६ मिनिटांपर्यंत ह.भ.प. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर, भद्रावती यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्या कीर्तनातून भाविकांना अध्यात्मिक विचारांचे श्रवण करता येणार आहे. दुपारी २ वाजून १६ मिनिटांपासून सायंकाळी ७ वाजून १६ मिनिटांपर्यंत महाप्रसाद व घुगरीकाला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर भजन संध्या कार्यक्रमातून भक्तिरसाची अनुभूती भाविकांना घेता येणार आहे. या सोहळ्यात महासाधनेतील व्याख्यानमालेचे वक्ते डॉ. देवेंद्र यादव, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार अविनाश कन्नाके आणि ह.भ.प. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर यांची उपस्थिती व कार्यक्रमातील सहभाग हे विशेष आकर्षण राहणार आहे.

*भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन*

या धार्मिक सोहळ्याचे आयोजन उल्हास नागोरावजी करपे, संचालक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा गोंडपिपरी तथा अध्यक्ष, राजुरा विभागीय कर्ज समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. धार्मिक श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक सहभागातून हा सोहळा उत्साहात साजरा व्हावा, यासाठी परिसरातील सर्व भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये