आ.बच्चू कडू यांच्यापुढे निप्पॉन प्रकल्पग्रस्तांनी मांडली व्यथा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी आज, शुक्रवार, माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांच्या भद्रावती दौऱ्यादरम्यान निवेदन सादर करण्यात आले. मुरलीधर पाटील गुंडावार लॉन येथे झालेल्या या भेटीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
निवेदनातील माहितीनुसार, १९९४ मध्ये तत्कालीन सरकारने भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत केल्या होत्या. त्यानंतर २०२५ मध्ये भाजप सरकारच्या काळात न्यू ग्रेटा आणि न्यू एरा कोल गॅसिफिकेशन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले. मात्र, विविध प्रकल्पांसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नसल्याची भूमिका प्रकल्पग्रस्तांनी मांडली. जमीन गेल्यानंतरही अपेक्षित लाभ, रोजगार आणि पुनर्वसनाच्या प्रश्नांवर ठोस तोडगा निघत नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले.
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी यावेळी आमदार बच्चू कडू यांच्याकडे करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आता ठोस निर्णय होणार का, याकडे संबंधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी संघर्ष केला तरच पदरात काही पडेल असे नमूद करून जिल्ह्यातील विविध समस्या, अप्रेंटिश चा विषय, परप्रांतीय कामगार विषयआदी सोडविण्याबाबत स्वतः आग्रही असल्याचे सांगितले. व्यासपीठावर वासुदेव ठाकरे बंडू भादेकर, लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, उपाध्यक्ष सुधीर सातपुते, संघर्ष समिती अध्यक्ष प्रवीण सातपुते, आदी सह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अनुप कुटेमाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप खुटेमाटे यांनी केले.



