ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुपगाव शाळेतील शिक्षक गैरहजर प्रकरणाची चौकशी सुरु

मुख्याध्यापकासह शिक्षकांचे बयान आटोपले ; दोन सदस्यीय समिती गठित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

 गोंडपिपरी :_ तालुक्यातील सुपगाव जिल्हा परिषद शाळेत शनिवारी (दि.२९) सर्वांच्या सर्व शिक्षक गैरहजर राहिल्याने पालक वर्गात संतापाची लाट उसळली. शाळेतील विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या गंभीर प्रकाराची तालुका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात सोमवारी (दि.३१) संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या दालनात दुपारनंतर सुनावणी घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांनी लेखी बयान सादर केले. मात्र या स्पष्टीकरणावर समाधान न झाल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी सखोल चौकशीसाठी दोन सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. यात शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखाचा समावेश आहे. चौकशीनंतर गैरहजर शिक्षकांवर काय कार्यवाही होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव शाळेत संतापजनक प्रकार शनिवारी घडला. तब्बल ६३ विद्यार्थी शाळेत उपस्थित असताना एकही शिक्षक शाळेत हजर राहिले नाही. पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शाळेचा प्रवेशद्वार खोलला. हा गंभीर प्रकार उघडकीस येताच संतप्त पालकांनी शाळेत जमाव करून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. शनिवारी शाळेचे मुख्याध्यापक आनंद कोंडेवार रजेवर होते. मात्र सहाय्यक शिक्षक संतोषी पेटकर आणि मंगेश पेंदाम हे मुख्याध्यापक, शाळा समितीला कल्पना न देता अनाधिकृतरीत्या गैरहजर राहिले. तर दिनेश देवाळकर नामक शिक्षक सत्र सुरू झाल्यापासून वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती पुढे आली.

शाळेतील विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षक गैरहजर राहिलेल्या संतापजनक आणि गंभीर असलेल्या या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. दोन दिवसांत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आदेश देण्यात आले आहेत. यामुळे चौकशीनंतर आता “त्या” गैरहजर राहिलेल्या शिक्षकांवर कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण गोंडपिपरी तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.

  शिक्षक गैरहजर चौकशी प्रकरणी नेमलेल्या दोन सदस्य समितीत शिक्षण विस्तार अधिकारी वैभव खांडरे आणि गोंडपिपरीचे केंद्रप्रमुख सचिन धकाते यांचा समावेश आहे.

      सुपगाव शाळा शिक्षक गैरहजर प्रकरणी चौकशी सुरू झालेली असल्याची माहिती दामिनी महाजन, गटशिक्षणाधिकारी यांनी दिली तर सध्या चौकशी सुरू असल्याने या संदर्भात अधिक माहिती सांगू शकत नसल्याचे मत केंद्रप्रमुख सचिन धकाते यांनी व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये