भीमाशंकरच्या विकासात योगदान देता आले, हे महादेवाचे आशीर्वादच – सुधीर मुनगंटीवार
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले भगवान श्री भीमाशंकराचे दर्शन व अभिषेक

चांदा ब्लास्ट
वित्तमंत्री पदाच्या कार्यकाळात १४८ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी; भीमाशंकरच्या विकासाचे भव्य रूप पाहून समाधान
पुणे – महादेवाच्या चरणी नतमस्तक होताना मन कृतार्थ झाले; श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या विकासात योगदान देता आले, हे माझे परमसौभाग्य आहे, अशी भावना माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे भक्तिभावाने दर्शन व अभिषेक केल्यानंतर ते बोलत होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या पावन क्षेत्राच्या विकासासाठी वित्तमंत्री पदाच्या कार्यकाळात १४८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला आकार देता आला, याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. आज या प्रयत्नांतून साकारत असलेले भीमाशंकरचे बदलते भव्य रूप पाहताना मनाला विशेष आनंद होत असल्याचेही आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, माझ्या वित्तमंत्री पदाच्या कार्यकाळात श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी १४८ कोटी रुपयांचे महत्त्वाकांक्षी विकास आराखडा मंजूर करता आला, हे माझ्यासाठी केवळ प्रशासकीय काम नव्हे, तर महादेवाच्या चरणी लाभलेले पवित्र सौभाग्य आहे. आज या विकासकामांमुळे भीमाशंकराचे बदलते, विकसित आणि भव्य-दिव्य रूप पाहताना मन कृतार्थ झाले. या पावन भूमीच्या विकासासाठी आपल्या परीने योगदान देता आले, याचे समाधान शब्दांत व्यक्त करता येणार नाही,अशी भावना आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
महादेवाच्या चरणी नतमस्तक होताना आ. मुनगंटीवार यांनी जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्याची प्रार्थना केली. आयुष्याच्या वाटेवर कितीही आव्हाने आली तरी तुझ्यावरील श्रद्धा अढळ राहू दे. सेवेची वाट अखंड राहू दे, संकल्पांना सामर्थ्य लाभू दे आणि जनकल्याणासाठी कार्य करण्याची ऊर्जा सदैव मिळू दे,अशी प्रार्थना आ. मुनगंटीवार यांनी महादेवाच्या चरणी केली.
दरम्यान, श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश कौदरे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला. यावेळी विकास आराखड्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेच्या भावना मनाला स्पर्शून गेल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. याप्रसंगी देवस्थानचे ट्रस्टी श्री. मधुकर गव्हांदे, पुजारी श्री. राहुल कोडीलकर, घोडेगावचे युवा उद्योजक श्री. अमर काळे, श्री. योगेश तळेकर, उद्योजक श्री. प्रदीप ठाकूर तसेच श्री. दत्तात्रय हिले उपस्थित होते.



