गोंडपिपरी तालुक्यात वडेट्टीवार दांपत्याची “दमदार एन्ट्री”
किशोर वडेट्टीवार करंजी तर गिता वडेट्टीवार पानोरा गावचे रहिवासी ; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला उधाण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
निवडणूक आयोगाकडून प्रारूप मतदार याद्या सोमवारी (३१ ऑगस्ट) प्रकाशित करण्यात आल्या. यामुळे थांबलेल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आपसूकच चर्चेत आल्या. असे असताना सोमवारी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात विजय वडेट्टीवार यांचे धाकटे बंधू किशोर वडेट्टीवार यांचे तर किशोर वडेट्टीवार यांच्या पत्नी गीता वडेट्टीवार यांचे नाव पानोरा गावात नोंद असल्याची बाब समोर आली.
यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार कुटुंबीयांचे नाव गोंडपिपरी तालुक्यातील मतदार यादीत नावाच्या समावेशामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे. किशोर वडेट्टीवार सध्यस्थितीत गडचिरोली शहरात वास्तव्याने आहेत. अश्यावेळी गोंडपिपरी तालुक्यातील यादीमध्ये वडेट्टीवार दांपत्याच्या दमदार एन्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे आगामी दिवसात गावाकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या आक्षेप आणि हरकतीकडे सुद्धा लक्ष लागले आहे.
राज्यात सोमवारी (दि. ३१) सर्वत्र प्रारूप मतदार याद्यांच्या प्रकाशनानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ओबीसींचे आरक्षण ५० टक्केच्या वर गेल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला आहे. गावगाडा बंद पडला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील करंजीचे भूमिपुत्र असलेले विजय वडेट्टीवार आज राज्याचे विधिमंडळ गटनेते तसेच जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. वडेट्टीवारांचे वडील नामदेवराव वडेट्टीवार करंजीचे सरपंच होते. त्यांचे बंधू विलास वडेट्टीवार हे करंजीचे उपसरपंच होते. करंजी गावाच्या विकासात वडेट्टीवार कुटुंबाचे मोठे योगदान राहिले आहे. विजय वडेट्टीवारांनी लहानपणीच गाव सोडले. मात्र गावाची बांधिलकी आणि जिव्हाळा अद्यापही कायम आहे.
असे असताना सोमवारी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत करंजी गावात वडेट्टीवारांचे धाकटे बंधू किशोर वडेट्टीवार यांचे नाव समाविष्ट असल्याने स्थानिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर किशोर वडेट्टीवार यांच्या पत्नी गीता वडेट्टीवार यांचे नाव तालुक्यातील पानोरा गावात नोंद आहे. आगामी दिवसात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या “हायप्रोफाईल एंट्रीने” चर्चेला उधाण आले आहे.
*जि.प.निवडणुकीची रणनीती. ?*
सद्यस्थितीत गोंडपिपरी तालुक्यातील करंजी धानापुर जिल्हा परिषद क्षेत्र हे सर्वसाधारण स्त्री करिता आरक्षित आहे.मध्यंतरीच्या काळामध्ये गीता किशोर वडेट्टीवार यांचे नाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी चर्चेत आले होते.यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ही रणनीती आहे की काय ? असा विषय चर्चिला जात आहे.
*सर्वसाधारण आरक्षणावर डोळा ?*
करंजीत सरपंचाचे सर्वसाधारण आरक्षण असल्याने गावात मोठी रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे.प्रस्तावित करंजी एमआयडीसीच्या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे ठेवून तर ही एन्ट्री नाही ना .?, अशी देखील चर्चा जनसामान्यात आहे.
*आक्षेप आणि हरकतीकडे तालुका वासियांचे लक्ष*
आगामी निवडणुका आणि प्रस्तावित करंजी एमआयडीसी या दोन्ही विषयाला घेऊन किशोर वडेट्टीवार यांनी गोंडपिपरी तालुक्यात नाव नोंदविल्याची चर्चा आहे. या हाय प्रोफाईल एंट्रीवर येणाऱ्या दिवसात मतदार यादीवर गावकऱ्यांकडून होणाऱ्या स्वागत की आक्षेप, हरकतीकडे संपूर्ण तालुका वासियांचे आता लक्ष लागले आहे.



