ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीत डास प्रतिबंधात्मक फॉगिंग फवारणी सुरू

_निवेदनाची दखल घेत नगरपंचायतीकडून तात्काळ कारवाई.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. वाढत्या डासांमुळे नागरिकांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला असून याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेत नगरपंचायत गोंडपिपरीने अखेर डास प्रतिबंधात्मक फॉगिंग फवारणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राप्त माहितीनुसार, दि. २० ऑगस्ट रोजी नगरपंचायत प्रशासनाला डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत भाजपा तालुका महामंत्री निलेश संगमवार आणि भाजयुमो तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक राकेश पूण यांच्याकडून निवेदन देण्यात आले होते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने फॉगिंग मशीनद्वारे डास प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने गोंडपिपरी शहरातील विविध भागांत फॉगिंग करण्याचे नियोजन केले आहे.

नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने दि. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजतापासून गोंडपिपरी शहरातील विविध भागांत फॉगिंग मशीनद्वारे डास प्रतिबंधात्मक फवारणी सुरू करण्यात आली. शहरातील नागरिकांना डासांपासून दिलासा मिळावा आणि डेंग्यू, मलेरिया यांसारख्या संभाव्य आजारांचा धोका कमी व्हावा, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

या संदर्भात नगरपंचायतीकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. निवेदनाची तात्काळ दखल घेत प्रशासनाने फवारणी सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, ही फवारणी केवळ काही दिवसांपुरती मर्यादित न ठेवता शहरातील सर्व प्रभागांमध्ये नियमितपणे करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

नगरपंचायत व तालुका प्रशासनाने स्वच्छता मोहिमेलाही अधिक प्रभावीपणे राबवावे, साचलेले पाणी, कचरा व डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात येत आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी नगरपंचायत प्रशासनाने फॉगिंगसह स्वच्छता आणि डास निर्मूलनाची व्यापक मोहीम सातत्याने राबवावी, अशी अपेक्षा गोंडपिपरीकरांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये