एकल महिला धोरणासाठी पोंभूर्णा नगरपंचायतीकडून सर्वेक्षण व नोंदणी सुरू
विधवा, घटस्फोटित, अविवाहित व परित्यक्ता महिलांनी नोंदणी करण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :-एकल महिलांना सामाजिक, आर्थिक व विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक माहिती संकलित करता यावी, यासाठी एकल महिला धोरणांतर्गत पोंभूर्णा नगरपंचायतीकडून सर्वेक्षण व नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेत विधवा, घटस्फोटित, अविवाहित आणि परित्यक्ता महिलांची नोंदणी करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरातील एकल महिलांची माहिती संकलित करून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, आर्थिक व सामाजिक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे तसेच त्यांच्या शिक्षण व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.नगरपंचायत कार्यालय, पोंभूर्णा येथे पात्र महिलांची नोंदणी करण्यात येत असून, जास्तीत जास्त पात्र एकल महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक सुरक्षा, आर्थिक स्वावलंबन आणि सन्मानपूर्वक जीवन या तीन प्रमुख आधारस्तंभांवर एकल महिला धोरण उभारण्यात आले असून.एकल महिला धोरणाच्या नोंदणी व सर्वेक्षणातून पात्र महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळण्यास मदत होणार असून, आर्थिक व सामाजिक सुरक्षा, विविध शैक्षणिक व रोजगाराच्या संधी तसेच हक्कांची जाणीव निर्माण करण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.पात्र महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह नगरपंचायत कार्यालयात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन नगराध्यक्ष सुलभा पिपरे व मुख्याधिकारी निखिल लांडगे यांनी केले आहे.
नोंदणीसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड अथवा उत्पन्नाचा दाखला आणि बँक पासबुक ही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.



