तहसीलदार व महसूल पथकावरील जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरू असलेले काम बंद आंदोलन 10 सप्टेंबरपर्यंत स्थगित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी अंढेरा फाटा येथे अवैध रेती वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत असताना तहसीलदार देऊळगाव राजा श्रीमती वैशाली डोंगरजाळ मॅडम, ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात, वाहनचालक संतोष भोपळे व शिपाई पंजाबराव ताटे यांच्या पथकावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.
या प्रकरणी हर्षल अंभोरे, रा. एकलारा, ता. चिखली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, सदर प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटना, विदर्भ पटवारी संघटना नागपूर-2, महसूल सेवक संघटना व मंडळ अधिकारी संघटना यांच्या वतीने दिनांक 19 ऑगस्ट 2026 पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर दिनांक 24 ऑगस्ट 2026 पासून काम बंद आंदोलन करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या दालनात संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर हटकर, जिल्हा सरचिटणीस गजानन मोतेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत वाघ, जिल्हाधिकारी कार्यालय अध्यक्ष चेतन मोहने,विदर्भ पटवारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय धोंडगे, तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील,तालुकाध्यक्ष शिवानंद आंधळे, महसूल सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तांबे साहेब, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. खांदे साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. गायकवाड साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कव्हळे साहेब, उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा श्री. खडसे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा श्री. ठोसरे साहेब यांची उपस्थिती होती.
बैठकीमध्ये पोलीस विभागाच्या वतीने सदर प्रकरणातील मुख्य आरोपीस दिनांक 10 सप्टेंबर 2026 पर्यंत अटक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना काम बंद आंदोलनामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन संघटनांनी दिनांक 10 सप्टेंबर 2026 पर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार सर्व महसूल कर्मचारी दिनांक 2 सप्टेंबर 2026 पासून नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहून आपले शासकीय कामकाज सुरू करतील.
तथापि, दिनांक 10 सप्टेंबर 2026 पर्यंत मुख्य आरोपीस अटक न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरविण्यात येईल, अशी माहिती महसूल कर्मचारी संघटना व संबंधित संघटनांच्या वतीने देण्यात आली आहे.
महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी संघटनांची मागणी
अवैध रेती व इतर गौण खनिजांच्या वाहतुकीवर कारवाई करताना महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना गंभीर असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन व पोलीस विभागाने महसूल कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही
— महसूल कर्मचारी संघटना व संबंधित संघटना, जिल्हा बुलढाणा यांनी केली आहे,



