अद्याप सुमारे २,१०० लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट प्रलंबित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
तहसील कार्यालयामार्फत पोंभुर्णा तालुक्यात विविध योजनांचे एकूण ९,९८२ लाभार्थी असून, त्यापैकी अद्याप सुमारे २,१०० लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट प्रलंबित आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या योजनांतील लाभार्थ्यांना लागू
संजय गांधी निराधार अनुदान योजना
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना
तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर सामाजिक सहाय्य योजना
डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कसे सादर कराल?
लाभार्थ्यांनी आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र (CSC) येथे जाऊन बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे डिजिटल हयातीचा दाखला ऑनलाइन अपडेट करून घ्यावा. दिव्यांग, आजारी किंवा केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या लाभार्थ्यांना गावातील तलाठी, महसूल सेवक किंवा पोलीस पाटील यांच्यामार्फतही मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.



