नागपूर-तुळजापूर महामार्गावर क्रूझर आणि टिप्परचा भीषण अपघात
१४ भाविक गंभीर जखमी ; रमणा फाट्याजवळील घटना
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नागपूर-तुळजापूर महामार्गावरील सेलू तालुक्यातील रमणा फाट्याजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. दिनांक २२ आगस्टला दुपारी एक वाजता दरम्यान गुजरात राज्यातील वडद येथील भाविकांना घेऊन जाणाऱ्या क्रूझर वाहनाने (क्र. DD-03W9666) पुढे चाललेल्या टिप्परला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने क्रूझरमधील १४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वडद गुजरात येथील एकूण २२ भाविक क्रूझर वाहनाने नांदेड येथे दर्शनासाठी जात होते. प्रवासादरम्यान रमणा फाट्याजवळ वाहनावरील ताबा सुटल्याने क्रूझरची टिप्परशी जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की क्रूझर वाहनाचा पुढील भाग चक्काचूर झाला. यामध्ये क्रूझरचा चालक अत्यंत गंभीर जखमी झाला असून १४ प्रवाशांना दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत स्थानिक नागरिक व ‘रुग्णमित्र’ प्रज्वल लटारे यांच्या मदतीने बचावकार्य राबवले. जखमींना तात्काळ उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये राखीपाल पाटील (४५), साया मक्षी गोंड (३), राजुदेव रावते (३७), तेजल रशीदभाई भारत (१८), हिना तुळशे डोनमाल्या (२४), सुरेश रावते (३५), प्रवीण जानू कहात (४१), हर्षदा ईश्वर कहात (२७), गंगाबाई ईश्वर कहात (४७), जमशेत रतन खलनायक (५६), रामू रामजी भाई रावत (४५), प्रकाशभाई गुणाभाई वाधवा (३६), रोमा निलेश थोरात (३५) आणि सुमित्रा बल्लू वरखन (४०) सर्व राहणार गुजरात यांचा समावेश आहे.
या अपघाताचा पुढील तपास सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उ.नि.निरंजन वरभे, मंगेश राऊत, सुनील चावरे,जमादार जावेद धामीयासह करीत आहे.



