पोलीस अधीक्षक वर्धा यांच्याकडून आंजी (मोठी) येथील जि. प. प्राथमिक शाळेला सदिच्छा भेट
विद्यार्थ्यांशी साधला संवाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री सौरभ कुमार अग्रवाल यांनी आज सकाळी १०.३० वाजता ‘जि. प. प्राथमिक केंद्र शाळा, आंजी (मोठी), ता. जि. वर्धा’ या शाळेला सदिच्छा भेट दिली. शाळेचा पहिला दिवस असल्याने पोलीस अधीक्षकांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. या भेटीदरम्यान माननीय पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
शैक्षणिक साहित्याचे वाटपः शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित मुला-मुलींना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच मूला मुलींना पुस्तके आणि शाळेचा गणवेश वाटप करण्यात आला. भेटी दरम्यान पोलीस अधीक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि गावचे सरपंच प्रामुख्याने उपस्थित होते.


