ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार अमर काळे, जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले चिमुकल्यांचे स्वागत

जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा : पहिल्याच दिवशी पुस्तके व गणवेशांचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आज संपूर्ण जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धींगत करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून चिमुकल्यांचे स्वागत केले.

विदर्भात राज्यमंडळाच्या शाळा 30 जून पासून सुरू झाल्या. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. खासदार अमर काळे यांनी आर्वी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक कन्या शाळेत जाऊन नवागत बालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना पाठपुस्तके व गणवेश वितरीत केले.

शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत चला शाळेत जाऊया या घोषवाक्यासह फलक, पालखी, सजावट, रांगोळी आणि पारंपारिक स्वागताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी वान्मथी सी व मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी पराग सोमण यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येळाकेळी येथे जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थी व पालकांचे उद्बोधन केले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उद्बोधनपर नाट्य सादर केले. विद्यार्थ्यांचा पहिल्याच दिवशी उत्साह दिसून आला. शालेय प्रांगणात शैक्षणिक उपक्रम व योजनांवर आधारित रांगोळीचे रेखाटन करण्यात आले होते. एक पेड मां के नाम, विद्यार्थी सुरक्षा, इको क्लब, पोषण थाली याविषयावरील रांगोळीचे आकर्षण दिसून आले. जिल्हा परिषद शाळांनी संपादन केलेला पालकांचा विश्वास विविध शाळांत वाढलेल्या पटसंख्येच्या रूपाने दिसून आला.

जिल्ह्यातील विविध विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय राजपत्रित अधिकाऱ्यांनी १०० शाळा भेट उपक्रमांतर्गत १०० शाळांना भेटी देऊन शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेतला. शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी ठिकठिकाणी शाळेत उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी पुस्तके व गणवेश वाटप

शाळेच्या पहिल्याच दिवशी आज इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयाची पुस्तके मोफत देण्यात आली. यावर्षी जिल्ह्यात जिल्हा परिषद, नगर परिषद व खाजगी अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना एकूण 4 लाख 46 हजार 787 पाठ्यपुस्तकांचे तसेच जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांतील 41 हजार 340 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. तसेच पोषण आहार अंतर्गत पौष्टिक मध्यान्ह भोजन देण्यात आले, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये