ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोहायला गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चांदगाव रोड जवळील (नाला) डोंगे घाट येथे आज मंगळवार, दिनांक २ जून २०२६ रोजी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने नाल्यात बुडून मृत्यू झाला. नैतिक अशोक शेंडे (वय १६ वर्ष, रा. जानी वार्ड ब्रम्हपुरी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो स्थानिक ख्रिस्तानंद स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. या घटनेमुळे ब्रम्हपुरी शहरात आणि परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत नैतिक शेंडे हा वनविभागात मजूर म्हणून कार्यरत असलेले अशोक शेंडे यांचा मुलगा होता. नैतिक नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ६:०० वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी येथील क्रीडा संकुलात बास्केटबॉल खेळण्यासाठी गेला होता. बास्केटबॉल खेळून झाल्यानंतर नैतिक आणि त्याचे मित्र सौम्य अतुल ढोक (रा. सम्राट अशोक चौक, ब्रम्हपुरी) व जय योगेश राऊत (रा. नान्होरी) हे तिघे सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास चांदगाव रोडवरील डोंगेघाटात अंघोळ करण्यासाठी गेले. घाटावर पोहोचल्यानंतर, “मी पहिले पाण्यात जातो, त्यानंतर तुम्ही या,” असे मित्रांना सांगून नैतिकने पाण्यात उडी घेतली. मात्र, डोंगे घाटावरील तो भाग अत्यंत खोलगट असल्याने नैतिकला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात बुडू लागला.

नैतिक पाण्यात दिसेनासा झाल्यानंतर त्याचा मित्र सौम्य ढोक याने तातडीने धावत जाऊन सकाळी ८:०० वाजताच्या सुमारास नैतिकचे वडील अशोक शेंडे यांना घटनेची माहिती दिली. मुलाचा मित्र धापा टाकत घरी पोहोचला आणि त्याने “नैतिक पाण्यात बुडाला आहे, लवकर चला,” असे सांगताच शेंडे कुटुंबावर आभाळ कोसळले. वडिलांनी तात्काळ चांदगाव रोडवरील नाल्याकडे धाव घेतली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच चांदगाव रोडवरील नाला डोंगे घाटावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. स्थानिक नागरिक आणि काही पोहणाऱ्या तरुणांनी तातडीने पाण्यात उतरून नैतिकचा शोध सुरू केला. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत उशीर झाला होता आणि नैतिकचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून, पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे मृतकाचे वडील अशोक शेंडे यांच्या तोंडी रिपोर्टवरून नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील कायदेशीर कार्यवाही करत आहेत. एका उमद्या आणि क्रीडाप्रेमी विद्यार्थ्याचा असा अकाली मृत्यू झाल्याने ख्रिस्तानंद शाळेसह संपूर्ण ब्रम्हपुरी शहरावर शोककळा पसरली आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि पावसाळ्याची चाहूल लागताना अनेक तरुण नदी, नाले किंवा घाटावर पोहण्यासाठी जात आहेत. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे आणि तरुणांनी पाण्याचा अंदाज नसलेल्या अज्ञात ठिकाणी पोहण्याचे धाडस करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये