ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेलू नगरपंचायतीचा विकास चव्हाट्यावर; नागरिकांचा संताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू : गेल्या अनेक वर्षांपासून सेलू शहरातील विकास चौक परिसरातील समस्या कायम असून नगरपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. बोरधरण रोडवरील विकास चौक हा शासकीय कार्यालयांच्या दृष्टीने महत्त्वाचा चौक म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी यापूर्वी प्रवासी निवारा उभारण्यात आला होता, मात्र तोही चुकीच्या जागेवर उभारण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

विशेष म्हणजे, या परिसरात महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक मुतारीची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना, विशेषतः महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अनेकदा महिलांना आपली लाज चव्हाट्यावर ठेवण्याची वेळ येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.

दरम्यान, सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी नगरपंचायत सेलूचे मुख्याधिकारी सी. ओ. अग्रवाल यांनी सहकाऱ्यांसोबत जागेची पाहणी करून मुतारी उभारण्याचे काम सुरू केले. मात्र, नागरिकांच्या मते हे काम कोणतेही योग्य नियोजन न करता करण्यात आले आहे. मुतारीसाठी आवश्यक इतर सुविधा किंवा उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नसून केवळ पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून नालीचे काम सुरू असल्याने तथागत कॉम्प्लेक्सकडे जाणारा मुख्य रस्ता अडथळ्यांनी भरला असून परिसरातील दुकानदार व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नगरपंचायत प्रशासन तसेच नगराध्यक्ष स्नेहलताई देवतळे या शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील अपूर्ण व नियोजनशून्य कामांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सेलूकर नागरिकांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये